गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचा डावा कोपरारक्षक फैजल अत्राचलीने एकाच डावात बचावात घेतलेल्या ९ बळींच्या जोरावर गुजरातने पुणेरी पलटणचा ३५-२१ असा धुव्वा उडवला. गेल्या काही सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचा चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे आजचा सामना हा चांगलाच अटीतटीचा होईल असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यात गुजरातने सामन्यावर संपूर्णपणे वर्चस्व राखत सामना आपल्या खिशात घातला.
गुजरातच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो इराणी डावा कोपरारक्षक फैजल अत्राचली. फैजलने आजच्या साम्यात पुण्याच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवत सामन्यात ९ गुण मिळवले. सुरुवातीच्या सत्रात फैजलने पुण्याच्या काही खेळाडूंना अँकल होल्ड, थाय होल्ड करत पुण्याच्या आक्रमणाची हवाच काढून घेतली. दिपक हुडा, गुरुनाथ मोरे यासारख्या तगड्या चढाईपटूंना फैजलने केलेला बॅकहोल्ड पाहता तो या सामन्यात एका वेगळ्याच इराद्याने उतरला होता हे समजून येतं होतं. फैजलचा उजव्या कोपऱ्यातला साथीदार अबुझर मेघानीने ४ गुण तर परवेश भैंसवालने २ गुण मिळवत तोलामोलाची साथ दिली.
बचावफळीनेत गुजरातच्या विजयामधला महत्वाचा वाटा उचलल्यानंतर राहिलेलं काम हे चढाईपटूंनी करुन टाकलं. युवा खेळाडू सचिन, कर्णधार सुकेश हेगडे, रोहीत गुलिया आणि बदली खेळाडू पवन शेरावत यांनी आपापल्यापरीने पुण्याच्या संघाला धक्के देत गुजरातचा सामन्यातला विजय नक्की केला.
अवश्य वाचा – यू मुम्बाच्या काशिलींग आणि नितीनची लहानग्या कबड्डीपटूंसोबत मस्ती
पुण्याच्या संघाकडून कर्णधार दीपक हुडाने सामन्यात चढाईमध्ये ५ गुण मिळवले, त्याला गुरुनाथ मोरेने ३ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र पुण्याच्या एकाही चढाईपटूला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आली नाही. गुजरातच्या बचावपटूंच्या आक्रमक खेळीपुढे नंतरच्या सत्रात पुण्याचे बचावपटू हे हतबल ठरलेले पहायला मिळाले.
बचावफळीत गिरीश एर्नेकचा अपवाद वगळता एकाही चढाईपटूला चांगली कामगिरी करता आली नाही. गिरीशने काही सुंदर डॅश आणि अँकल होल्ड करत गुजरातच्या चढाईपटूंना वेसण घालण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या बाजूने संदीप नरवालचा अपवाद वगळता एकाही खेळाडूने त्याला साथ दिली नाही. मध्यंतरीच्या काळात पुण्याने आपल्या पराभवाचं अंतर ७ गुणांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेरच्या सत्रात पुण्याला पुन्हा ऑलआऊट करत गुजरातने सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखलं.