गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात आपला विजयाचा सिलसीला कायम ठेवला आहे. बंगळुरु बुल्स विरुद्धच्या सामन्यात पिछाडी भरुन काढत गुजरातने २७-२४ असा विजय मिळवला. इंटर झोन चँलेज स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यातही गुजरातने आपला विजयी घौडदौड कायम सुरु ठेवली आहे. गुजरातच्या संघाने आज सर्वसमावेशक खेळाचं प्रदर्शन केलं. वास्तविक पाहता बंगळुरु बुल्सच्या बचावपटूंनी गुजरातच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवत सामन्यात सुरुवातीचा काही काळ आघाडी घेतली होती. मात्र मोक्याच्या क्षणी गुजरातच्या चढाईपटूंनी आपल्या भात्यातली अस्त्र काढत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं.

गुजरातकडून सचिन, रोहीत गुलिया, बदली खेळाडू महेंद्र राजपूत यांनी चढाईत ४-४ पॉईंटची कमाई केली. त्याला कर्णधार सुकेश हेगडेने २ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली. गुजरातच्या बचावपटूंनीही आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. परवेश भैंसवालने या सामन्यात ४ पॉईंट मिळवत मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली, त्याला ईराणच्या अबुझर मोहरममेघानीने ३ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली.

बंगळुरु बुल्सकडून कर्णधार रोहीत कुमारचा अपवाद वगळता एकही चढाईपटू फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. बचावपटूंमध्येही रविंदर पेहलला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही, मात्र नवोदीत खेळाडू कुलदीप सिंहने ५ पॉईंट मिळवत संघाला एका क्षणापर्यंत चांगली आघाडी मिळवून दिली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरु बुल्सच्या बचावपटूंनी केलेल्या चुकांचा फायदा गुजरातला मिळाला. यावेळी गुजरातने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत, सामन्यावर आपली पकड मजबूत करत सामन्यात परतण्याची बंगळुरुला संधीच दिली नाही.

गुजरातचा संघ आपल्या घरच्या मैदानावर चांगल्याच फॉर्मात खेळतो आहे. त्यामुळे आगामी काळात त्याला घरच्या मैदानावर मिळालेल्या या विजयांचा फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पुणेरी पलटणची बंगाल वॉरियर्सवर मात

Story img Loader