प्रो-कबड्डीच्या अ गटात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघावर मात करत प्लेऑफच्या शर्यतीत आपला प्रवेश नक्की केला आहे. दोन तुल्यबळ संघात झालेल्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, मात्र अखेरच्या क्षणांत गुजरातने आपल्याकडे असलेली आघाडी टिकवत पाटणा पायरेट्सला ३३-२९ अशा फरकाने हरवलं.
पाटण्याच्या कर्णधार प्रदीप नरवालला गुजरातच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात आपलं लक्ष्य बनवलं. संपूर्ण सामन्यात प्रदीपला फारसे गुण कमावण्याची संधी गुजरातच्या बचावपटूंनी दिलीच नाही. यामुळे पाटण्यावर विजय मिळवणं गुजरातच्या संघाला सोपं गेलं. प्रदीपने सामन्यात अवघ्या ४ गुणांची कमाई केली. मोनू गोयत आणि विजयने सामन्यात प्रत्येकी ६-६ गुणांची कमाई केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. पाटण्याच्या बचावफळीलाही आज फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
गुजरातच्या संघाने आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळ केला. चंद्रन रणजीत, सचिन तंवर, महेंद्र राजपूत या खेळाडूंनी सामन्यात चढाईत गुणांची कमाई करत आपल्या संघाकडे आघाडी कायम ठेवली. महेंद्र राजपूतने दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून संघात प्रवेश करत सर्वाधीक ६ गुणांची कमाई केली. महेंद्र राजपूतच्या खेळाने पाटणा सामन्यात बॅकफूटवर ढकलली गेली. फजल अत्राचली, अबुझार मेघानी आणि परवेश भैंसवाल या बचावपटूंनी आजच्या सामन्यात आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
बचावपटूंची निराशाजनक कामगिरी हे गेल्या काही सामन्यांमध्ये पाटण्याच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरत आहे. विशाल माने, सचिन शिंगाडे या जोडगोळीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता येत नाहीये. यामुळे चढाईत प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत यांच्यावर संघाचा भार येतो. आगामी सामन्यात पाटणा आपल्या खेळात सुधारणा करते का हे पहावं लागणार आहे.