प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाची विजयी घौडदौड हरियाणा स्टिलर्स संघाने पुन्हा एकदा रोखली आहे. कोलकात्यात झालेल्या सामन्यात हरियाणाने गुजरातचं आव्हान ४२-३६ अशा फरकाने परतून लावलं. विकास कंडोलाच्या जागी संघात जागा मिळालेल्या प्रशांत कुमार रायने केलेल्या आक्रमक चढाईच्या जोरावर हरियाणाने गुजरातच्या घशातला विजयाचा घास हिरावून घेतला.
गुजरात फॉर्च्युनजाएंटचा संघ यंदाच्या पर्वात चांगल्याच फॉर्मात आहे. मात्र हरियाणाविरुद्ध खेळताना गुजरातचा संघ नेहमी कोलमडतो हे याआधीच्या सामन्यांमध्येही आपण पाहिलेलं आहे. आजच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने पहिल्यापासून आपलं वर्चस्व ठेवलेलं होतं. मात्र प्रशांत रायच्या खेळाने गुजरात सामन्यात मोठी आघाडी घेऊ शकला नाही. परवेश भैंसवाल, फैजल अत्राचली, अबुझर मेघानी या गुजरातच्या बचावफळीला प्रशांत रायने लक्ष्य बनवून सतत संघाबाहेर ठेवलं. आजच्या सामन्यात प्रशांतने चढाईत तब्बल १६ गुणांची कमाई केली.
दुसऱ्या बाजूने अनुभवी वझीर सिंहने प्रशांतला चांगली साथ दिली. वझीरने आजच्या सामन्यात चढाई आणि बचावात मिळून ९ गुण मिळवले. वझीरने मोक्याच्या क्षणी आपल्या समंजस खेळाचं प्रदर्शन करत हरियाणा संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवलं. वझीरच्याच खेळामुळे गुजरात सामन्यात हरियाणावर मोठी आघाडी घेऊ शकला नाही. हरियाणाच्या बचावफळीला सामन्यात सूर पकडायला दुसऱ्या सत्राची वाट पहावी लागली, मात्र मोक्याच्या क्षणी गुजरातच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात ओढत मोहीत छिल्लर आणि सुरिंदर नाडा या अनुभवी खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली.
बचावफळीकडून न मिळालेली साथ हे आज गुजरातच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं. गुजरातच्या चढाईपटूंची आजच्या सामन्यातही कामगिरी ही चांगली झाली. सचिनने १३ गुणांची कमाई करत, आपलं काम चोख पार पाडलं. त्याला रोहीत गुलियाने ३ तर कर्णधार सुकेश हेगडेने ४ पॉईंट मिळवत चांगली साथही दिली. त्यात दुसऱ्या सत्रात संघात संधी मिळालेल्या बदली खेळाडू महेंद्र राजपूतनेही झटपट ४ गुणांची कमाई केली. मात्र बचावफळीने मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका गुजरातला महागात पडल्या.
फैजल अत्राचलीला आजच्या सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. त्याचा साथीदार अबुझार मेघानीलाही अवघे २ गुण मिळवता आले. त्यात अखेरच्या क्षणी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे हरियाणाने सामन्यात अखेरच्या क्षणात आघाडी घेत गुजरातचे सामन्यात परतण्याचे सर्व दरवाजे बंद करुन टाकले. या पराभवामुळे गुणतालिकेत गुजरातच्या स्थानात फरक पडणार नसला तरीही त्यांच्या आत्मविश्वासाला या पराभवामुळे नक्कीच धक्का बसलेला आहे.