आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव करत हरियाणा स्टिलर्सने प्ले-ऑफच्या शर्यतीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील मैदानावर खेळवल्या गेलेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटणचा ३१-२७ अशा फरकाने पराभव केला. हरियाणाचा संघ अखेरच्या विजयासोबत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम राहणार आहे. मात्र या सामव्यात ७ पेक्षा कमी गुणांच्या फरकाने पराभव स्वीकारत पुणेरी पलटणने गुजरातचं स्थान धोक्यात आणलं आहे. साखळी फेरीत पुणेरी पलटणचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत, या दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास पुण्याचा संघ गुजरातला हटवून पहिलं स्थान पटकावू शकतो.
सुरुवातीपासून दोन्ही संघांमधला हा सामना बरोबरीत सुरु होता. दोघांनाही मोठी आघाडी घेण्यात यश आलं नव्हतं. मात्र हरियाणाकडून प्रशांत कुमार रायने ही कोंडी फोडत सामन्यातं पारड आपल्या संघाकडे झुकवलं. प्रशांतने आजच्या सामन्यात हरियाणाकडून चढाईत सर्वाधीक १२ गुणांची कमाई केली. त्याला इतर चढाईपटूंकडून हवीतशी साथ मिळाली नाही, मात्र प्रशांतने आपल्या जिवावर सामन्याचं पारडं आपल्याकडे झुकवलं. विकास कंडोलाने ३ गुण मिळवत त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. बचावफळीतही कर्णधार सुरिंदर नाडाने ४ गुणांची कमाई करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.
पुणेरी पलटणनेही आजच्या सामन्यात चांगला खेळ केला. चढाई आणि बचावपटूंनी हरियाणाला अखेरच्या क्षणापर्यंत चांगली टक्कर दिली. मात्र अखेरच्या क्षणी बचावफळीत गिरीश एर्नेकने केलेल्या काही क्षुल्लक चुका पुण्याच्या संघाला चांगल्याच महागात पडल्या. पुण्याकडून कर्णधार दीपक हुडाने चढाईत ८ गुणांची कमाई केली. त्याला बदली खेळाडू अक्षय जाधवने ४, राजेश मोंडलने २ गुण मिळवत चांगली साथ दिली.
बचावफळीत पुण्याच्या गिरीश एर्नेकने हरियाणाच्या चढाईपटूंवर चांगला अंकुश लावला होता. सामन्यात गिरीशने ५ गुणांची कमाई केली. त्याला इतर बचावपटूंनीही तितकीच चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या काही मिनीटांमध्ये हरियाणाच्या चढाईपटूंची अयोग्य पकड पुण्याला पराभवाच्या खाईत घेऊन गेली. या साखळी फेरीत पुण्याला आणखी दोन सामने खेळायचे आहेत, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावण्यात पुण्याचा संघ यशस्वी ठरतोय का हे पहावं लागणार आहे.