मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे प्रो-कबड्डीच्या सामन्याला काल प्रेक्षकांनी फारशी गर्दी केली नाही. मात्र यू मुम्बाने आपल्या जुन्या फॉर्मात परत येत हरियाणा स्टिलर्सवर मात केली. या सामन्यानंतर अनुप कुमारने हरियाणा स्टिलर्स संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं.
“हरियाणाच्या संघाने सामन्याआधीच आम्हाला कमी लेखण्याची चूक केली. आम्ही या सामन्यासाठी कोणतीही खास रणनिती आखलेली नव्हती. मात्र सामना सुरु होण्याआधी सराव करताना मला हरियाणाच्या खेळाडूंमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. यू मुम्बाचा संघ सध्या खराब खेळतो आहे, त्यामुळे आपण त्यांना सहज हरवू शकतो असं त्यांना वाटलं असेल, याचमुळे हरियाणाने कालचा सामना गमावला.” आपल्या संघाच्या कामगिरीविषयी आनंद व्यक्त करताना अनुप कुमारने पत्रकारांशी संवाद साधला.
यू मुम्बाचे प्रशिक्षक एदुचरी भास्करन यांनीही आपल्या संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. “अनुप कुमारला आजच्या विजयाचं खरं श्रेय द्यायला हवं. आमच्या बचावपटूंनी सामन्यात अनेक चुका केल्या, मात्र असं असतानाही अनुपने सामना हरियाणाच्या दिशेने झुकू दिला नाही. प्रत्येक छोट्या छोट्या अडचणींवर त्याने कालच्या सामन्यात मात केली.” सुरिंदर सिंहने कालच्या सामन्यात काही चुका केल्या, ज्यामुळे हरियाणाच्या संघाला सामन्यात परतण्याची संधी निर्माण झाली होती. पण भास्करन यांनी सुरिंदरच्या खेळाचं समर्थन केलं आहे. “सुरिंदर आता १९ वर्षाचा आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या खेळात काही चूका नक्कीच होतील. पण थोडा वेळ गेल्यानंतर तो देखील मोहीत छिल्लरसारखा कसलेला खेळाडू बनेल”. असं म्हणत सुरिंदरला प्रशिक्षक भास्करन यांनी आपला पाठींबा दर्शवला
आपल्या घरच्या मैदानावर यू मुम्बा अखेरचा सामना जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यांचा शेवट विजयाने करते का हे पहावं लागणार आहे.