प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वातील विजयी संघ पाटणा पायरेट्सने यंदाच्या हंगामातही आपला विजयरथ वेगाने पुढे न्यायला सुरुवात केली आहे. प्रदीप नरवालच्या पाटणा पायरेट्सने आज बंगळुरु बुल्सचा ४६-३२ असा १४ पॉईंटच्या फरकाने पराभव केला. सुरुवातीच्या सत्रात पहिली काही मिनीटं बंगळुरु बुल्सच्या संघाकडे ३-० अशी आघाडी होती. मात्र यानंतर पाटणा पायरेट्सने सामन्याती सुत्र हातात घेत बंगळुरुच्या संघाला तब्बल दोनवेळा ऑलआऊट केलं.

पाटणा पायरेट्सकडून कर्णधार प्रदीप नरवालने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. रेडींगमध्ये प्रदीप नरवालने रेडींगमध्ये तब्बल १५ पॉईंट मिळवले. त्याला मोनू गोयत आणि विनोद कुमारने ७-७ गुण मिळवत चांगली साथ दिली. प्रदीप नरवालच्या एकाही डावपेचाच उत्तर बंगळुरु बुल्सच्या बचावपटूकडे दिसलं नव्हतं.

रेडर्सप्रमाणे पाटणा पायरेट्सच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात कमाल केली. मराठमोळा चढाईपटू विशाल मानेने या सामन्यात बचावात ४ पॉईंट मिळवले, त्याला सचिन शिंगाडेने १ गुण मिळवत तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे बंगळुरु बुल्सचा संघ बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला.

बंगळुरु बुल्सकडून कर्णधार रोहीत कुमारने रेडींगमध्ये ८ पॉईंट मिळवले. त्याला अजय कुमारने ६ आणि गुरविंदर आणि आशिष सिंहने ४-४ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली. मात्र बंगळुरुच्या बचावपटूंनी आजच्या सामन्यात पुन्हा एकदा निराशा केली. संघाचा मुख्य उजवा कोपरारक्षक रविंदर पेहेलला संघात जागा मिळाली, मात्र आजच्या संपूर्ण सामन्यात त्याला केवळ २ पॉईंट मिळवता आले. त्यामुळे पाटण्याच्या बचावपटूंवर अंकुश लावण्याचं महत्वाचं काम बंगळुरुला करता आलं नाही.

घरच्या मैदानावर बंगळुरु बुल्सचा हा दुसरा पराभव ठरला. मात्र पाटणा पायरेट्सने आपला अष्टपैलू खेळ कायम ठेवत आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये बंगळुरुची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader