तब्बल १३ आठवडे आणि १०० हून अधिक सामने खेळल्यानंतर प्रो-कबड्डीचं पाचवं पर्व आपल्या उत्तरार्धात पोहचलं आहे. ‘अ’ आणि ‘ब’ गटातून सर्वोत्तम ३ अशा ६ संघांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला आहे. २३ ऑक्टोबरपासून मुंबई आणि चेन्नईच्या मैदानात हे सामने खेळवले जाणार आहेत. गुजरात फॉर्च्युनजाएंट, पुणेरी पलटण, हरियाणा स्टिलर्स, बंगाल वॉरियर्स, पाटणा पायरेट्स आणि उत्तर प्रदेश योद्धा या सहा संघांना प्ले-ऑफच्या गटात स्थान मिळालं आहे.
मात्र गेल्या पर्वांच्या तुलनेत यंदाच्या पर्वात अंतिम फेरी गाठण्यासाठीचे निकष आव्हानात्मक ठेवण्यात आले आहेत. नेमका कोणता संघ भाग्यवान ठरुन अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि कोणत्या संघाला पहिल्या पराभवानंतर गाशा गुंडाळावा लागेल याबाबत अनेक क्रीडा रसिकांच्या मनात साशंकता आहे. ही साशंकता आम्ही दूर करणार आहोत.
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफ फेरीचे दावेदार ठरले, पाहा कोणाला मिळाली संधी?
पहिला एलिमनेटर सामना – पुणेरी पलटण विरुद्ध युपी योद्धा (२३ ऑक्टोबर, मुंबई)
२३ ऑक्टोबरला मुंबईच्या एनएसयुआय मैदानावर पुणे विरुद्ध उत्तर प्रदेश हा सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल त्याचा प्रो-कबड्डीतला प्रवास त्याच क्षणी संपुष्टात येईल, तर विजेता संघ ‘एलिमनेटर ३’ सामन्यात दाखल होईल.
दुसरा एलिमनेटर सामना – पाटणा पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स (२३ ऑक्टोबर, मुंबई)
पाटणा पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स या संघांमध्ये दुसरा एलिमनेटर सामना रंगणार आहे. हा सामनाही २३ ऑक्टोबरला मुंबईच्या मैदानावर रंगेल. या सामन्यातील विजेता आणि पहिल्या एलिमनेटर सामन्यातील विजेता संघ तिसऱ्या एलिमनेटर सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील.
पहिला क्वॉलिफायर सामना – गुजरात फॉर्च्युनजाएंट विरुद्ध बंगाल वॉरियर्स (२४ ऑक्टोबर,मुंबई)
गुजरात आणि बंगाल या दोन्ही संघांनी आपापल्या गटात पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी दोघांना एक-एक संधी मिळणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीत आपली दावेदारी पक्की करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
तिसरा एलिमनेटर सामना – पहिल्या एलिमनेटर सामन्याचा विजेता विरुद्ध दुसऱ्या एलिमनेटर सामन्याचा विजेता (२४ ऑक्टोबर,मुंबई)
वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही एलिमनेटर सामन्यांतील विजेत्या संघांना या सामन्यात दोन हात करावे लागणार आहेत.
दुसरा क्वॉलिफायर सामना – पहिल्या क्वॉलिफायर सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध तिसऱ्या एलिमनेटर सामन्याचा विजेता संघ (२६ ऑक्टोबर,चेन्नई)
या संघातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.
अंतिम सामना – पहिल्या क्वॉलिफायर सामन्याचा विजेता विरुद्ध दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्याचा विजेता, २८ ऑक्टोबर (चेन्नई)