प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा फार थोड्या संघांना मिळालेला आहे. गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचा अपवाद वगळता तेलगू टायटन्स, बंगळुरु बुल्स, यूपी योद्धाज या तिन्ही संघांची घरच्या मैदानावरची कामगिरी ही यथातथाच राहिलेली आहे. आता या यादीमध्ये यू मुम्बाचा समावेश होण्याची शक्यता आहे. कारण आपल्या घरच्या मैदानावरील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यू मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुणेरी पलटणविरुद्धच्या सामन्यात यू मुम्बाचा संघ आघाडीवर होता, मात्र अखेरच्या क्षणी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे मुम्बाला पुन्हा एकदा पुण्याकडून हार पत्करावी लागली. मात्र पुण्याचा कर्णधार दीपक हुडा आपल्या संघाच्या कामगिरीवर चांगलाच खूश आहे. पाचव्या पर्वात आपला संघ अनुप कुमारच्या संघापेक्षा सरस असल्याची काही कारणच दीपकने सांगितली आहेत.
“मुम्बाविरुद्धच्या सामन्यात डोकं शांत ठेऊन खेळणं महत्वाचं होतं. एक-एक पॉईंट मिळवणं मला अत्यंत महत्वाचं वाटलं. सामन्यात यू मुम्बाचा संघ आघाडीवर होता, मात्र आम्ही तरीही बोनस पॉईंट मिळवण्यावर आपला भर दिला. जेव्हा तुम्ही पिछाडीवर असता तेव्हा बोनस पॉईंट हे तुमचं सर्वात मोठं अस्त्र असतं, त्यामुळे आमच्या प्रशिक्षकांनी जे सांगितलं तसं आम्ही मैदानात खेळत गेलो,” सामना संपल्यानंतर दीपक हुडाने पत्रकारांशी संवाद साधला.
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीत रेफ्रींचे चुकीचे ‘पंच’, दिग्गज खेळाडू नाराज
“पिछाडी भरुन काढत संघाने विजय मिळवला ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या पर्वापासून यू मुम्बा आपल्या प्रतिस्पर्धी संघाला मैदानात अक्षरशः लोळवते. पुणेरी पलटणविरुद्ध खेळताना यू मुम्बाचा इतिहास हा उजवा आहे. घरच्या मैदानावर खेळताना मुम्बाचा संघ हा नेहमी चांगल्या फॉर्मात असतो. त्यामुळे आम्हाला कडवी टक्कर मिळेल याची आम्ही तयारी केली होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात संघ ज्या पद्धतीने खेळला ते नक्कीच कौतुकास्पद आहे.”
प्रो-कबड्डीत पुणेरी पलटण आणि यू मुम्बाचे सामने हे रंगतदार होत असतात. या दोन्ही संघाच्या आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये यू मुम्बा ही नेहमी वरचढ राहिलेली आहे. मात्र यंदाच्या पर्वात पुणेरी पलटणने हा इतिहास बदलवून टाकत यू मुम्बाला दोनदा पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये पुणेरी पलटण आणि यू मुम्बा या दोन्ही संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.