गुणतालिकेत सर्वात तळाच्या स्थानावर असलेल्या तामिळ थलायवाजने उत्तर प्रदेशच्या संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात तामिळ थलायवाजच्या संघाने ३४-३३ अशी बाजी मारली.
उत्तर प्रदेशने कर्णधार नितीन तोमरने केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. तेलगूचा संघ हा या स्पर्धेतला दुबळा संघ मानला जात असल्याने उत्तर प्रदेश हा सामना सहज जिंकेल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज खरा ठरवत नितीन तोमरने चढाईत १४ गुणांची कमाई केली. त्याला मुंबईकर रिशांक देवाडीगाने ८ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.
मात्र बचावपटूंनी आजच्या सामन्यात पुन्हा एकदा निराशा केली. राजेश नरवालला या सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. नितेश कुमारने ५ गुणांची कमाई करत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र अखेरच्या सत्रात तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने मॅरेथॉन चढाया करत सामन्यात आपल्या संघाला बाजी मारुन दिली.
तामिळ थलायवाजकडून कर्णधार अजय ठाकूर आणि के. प्रपंजन या चढाईपटूंनी प्रत्येकी ८-८ गुणांची कमाई केली. सर्वात आश्वासक गोष्ट म्हणजे, आज तामिळ थलायवाजच्या बचावफळीनेही आपल्या चढाईपटूंना तोलामोलाची साथ दिली. अमित हुडाने सामन्यात सर्वाधीक ४ गुणांची कमाई केली तर सी. अरुण, डी. प्रताप या खेळाडूंनी २-२ गुणांची कमाई करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.