प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील मुंबईमधील शेवटच्या सामन्यात तेलगू टायटन्सने तामिळ थलायवाजवर मात केली आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना आज चांगलाच रंगतदार झाला. पण अखेर राहुल चौधरीच्या तेलगू टायटन्स संघाने या सामन्यात ३३-२८ अशी बाजी मारली.

अवश्य वाचा – मुंबईला कमी लेखून चूक केलीत! अनुप कुमारचा हरियाणाला टोला

तेलगू टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी आज एकसंध खेळाचं प्रदर्शन केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे तेलगूच्या आजच्या विजयात बचावपटूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सोमबीरने आजच्या सामन्यात बचावात तब्बल १० गुणांची कमाई केली. त्याला इराणच्या फरहाद आणि विशाल भारद्वाजने अनुक्रमे ४ आणि ३ गुण मिळवत चांगली साथ दिली. तामिळ संघातल्या अजय ठाकूर, के.प्रपंजनसारख्या महत्वाच्या खेळाडूंना सोमबीरने आपल्या जाळ्यात बरोबर अडकवलं.

चढाईपटूंमध्ये मराठमोळ्या निलेश साळुंखेने आज सर्वाधीक ५ गुणांची कमाई केली. त्याला राहुल चौधरी आणि मोहसीन मग्शदुलू यांनी चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात बचावपटूंनी तेलगू टायटन्सच्या विजयासाठी सर्वाधिक काम केल्यामुळे चढाईपटूंना फारशी मेहनत करावी लागली नाही. मात्र प्रत्येक खेळाडूने आपल्यावर आलेली जबाबदारी पुरेपूर निभावली.

तामिळ थलायवाजच्या संघानेही आज आपल्या खेळात सुधारणा करत तेलगू टायटन्सला चांगली टक्कर दिली. अजय ठाकूर, के.प्रपंजन यांनी चढाईत काही चांगले गुण मिळवत आपल्या संघाचं पुनरागमन केलं. त्यांना बचावपटूंनीही चांगली साथ दिली, मात्र मोक्याच्या क्षणी तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे तेलगू टायटन्सच्या संघाने आघाडी घेत सामन्यात बाजी मारली. या विजयानंतरही तेलगू टायटन्स आणि तामिळ थलायवाज हे संघ गुणतालिकेत आहे त्या जागेवरच राहिले आहेत.

Story img Loader