प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तेलगू टायटन्सच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. घरच्या मैदानावर सलग चौथ्या सामन्यात तेलगू टायटन्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. बंगाल वॉरियर्सने आज तेलगूच्या संघावर ३०-२४ असा विजय मिळवला. गेले चार सामने तेलगूचा संघ आपल्या जुन्या चुकांमधून कोणताही धडा घेताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तेलगूवर मात करणं सोप जातंय.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गुजरात विरुद्ध हरियाणाचा सामना बरोबरीत

आजच्या सामन्यात राहुल चौधरी, निलेश साळुंखे आणि विकास यांनी तेलगूकडून चांगली सुरुवात केली. मात्र बंगाल वॉरियर्सच्या मणिंदर सिंहने आपल्या पहिल्याच रेडमध्ये २ पॉईंट मिळवत तेलगू टायटन्सला हादरा दिला. यानंतर बंगाल वॉरियर्सने सामन्यावर मिळवलेली पकड शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही. कोरियन खेळाडू जँग कून ली, आणि मणिंदर सिंह यांच्या जोरावर बंगालच्या संघाने तेलगूला पहिल्या सत्रात ऑलआऊट करत १३-८ अशी आघाडी घेतली. बंगालकडून डिफेन्समध्ये रण सिंह आणि श्रीकांत तेवतिया यांनी तेलगू टायटन्सच्या संघाचं कंबरडच मोडून टाकलं.

गेल्या काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही तेलगू टायटन्सचे इतर खेळाडू राहुल चौधरीला साध देऊ शकले नाही. निलेश साळुंखे आणि विकासचा अपवाद वगळता तेलगूची बचावफळी सामन्यात पुन्हा अपयशी ठरली. ज्याचा भार साहजिकपणे राहुल चौधरीवर आला. दुसऱ्या सत्रात राहुल चौधरीला १० मिनीटांपेक्षा जास्त काळ संघाबाहेर बसवण्यात बंगालचा संघ यशस्वी झाला होता. तेलगू टायटन्सकडून मराठमोळ्या निलेश साळुंखेने आपल्या रेडींगमध्ये काही चांगले टच पॉईंट मिळवत राहुलला परत जिवंत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बंगालच्या बचावपटूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. अखेरच्या सत्रात रण सिंहने राहुल चौधरीचा बॅकहोल्ड करत तेलगू टायटन्सच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरवलं.

सुरजित सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगाल वॉरियर्सने पहिल्याच सामन्यात चांगला खेळ केला. रेडींग आणि डिफेन्समध्ये संघ एक होऊन खेळल्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर सामन्यात सतत दबाव येत राहीला. हा सामना ७ पेक्षा कमी गुणांच्या फरकाने हरल्यामुळे तेलगू टायटन्सला या सामन्यातून १ पॉईंट मिळालेला आहे, मात्र काही खेळाडूंना येणारं सतत अपयश हा तेलगूच्या संघासाठी आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सचा अखेरचा सामना ३ तारखेला गतविजेचत्या पाटणा पायरेट्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या आव्हानाला तेलगू टायटन्सचा संघ कसा सामोरा जातो हे पहावं लागणार आहे.

Story img Loader