राहुल चौधरीच्या तेलगू टायटन्स या संघाला आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. काल गतविजेच्या पाटणा पायरेट्सने तेलगू संघावर मात केली. तर आज बंगळुरु बुल्सने तेलगू टायटन्सवर ३१-२१ अशी १० गुणांच्या फरकाने मात केली. तेलगू टायटन्सचा संघ हा नेहमीप्रमाणे या सामन्यात कर्णधार राहुल चौधरीच्या कामगिरीवर अवलंबून होता. सामन्याच्या सुरुवातीला राहुल चौधरीने प्रो-कबड्डीच्या इतिहासातला आपला ५०० वा बळी मिळवत सुरुवात तर चांगली केली होती. मात्र त्यानंतर बंगळुरुच्या बचावपटूंनी राहुलवर सतत आक्रमण करत तेलगू टायटन्सवर हल्लाबोल केला.
संपूर्ण सामन्यात राहुल चौधरीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही, ज्यामुळे तेलगू टायटन्सचा संघ संपूर्ण सामन्यात चाचपडताना दिसला. राहुल चौधरीला या सामन्यात अवघे ३ गुण मिळवता आले. बंगळरुच्या रविंदर पेहेल याने राहुल चौधरीला सतत टार्गेट केलं. रविंदर पेहेलने केलेले अँकल होल्ड, डॅश यामुळे तेलगू टायटन्सच्या रेडर्सना मैदानात टिकूनच देत नव्हते. तेलगू टायटन्सनच्या बाकी रेडर्सनाही या सामन्यात सूर सापडला नाही. निलेश साळुंखेने या सामन्यात थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यालाही फारस यश मिळालं नाही. पहिल्या सत्रात बेंगळुरु बुल्सने ५-१२ अशी मोठी आघाडी घेतली होती.
अवश्य वाचा – कबड्डीला क्रिकेटपेक्षा मोठं करायचंय – अनुप कुमार
बंगळुरु बुल्सने यंदाच्या हंगामात आपल्या संघात नवोदीत खेळाडूंना संधी दिली. कर्णधार रोहीत कुमारने या सामन्यात आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. रेडींगमध्ये आपल्या संघाची धुरा खांद्यावर सांभाळताना रोहीत कुमारने १० पॉईंट मिळवले, याशिवाय रोहीतने बचावातही काही चांगले पॉईंट मिळवले.
तेलगू टायटन्सच्या संघातील बचावफळीने केलेली निराशाजनक कामगिरी, राकेश कुमारला न सापडलेला सूर यामुळे तेलगू टायटन्सचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या सामन्यात तेलगू टायटन्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाच्या विजयात सांगलीचा काशिलींग चमकला