प्रो कबड्डीच्या पाचव्या पर्वात यू मुम्बाचा संघ सलग दुसऱ्या पर्वात उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे. आज जयपूर विरुद्ध हरियाणा सामन्यात जयपूरला पराभव पत्करावा लागल्याने पुणेरी पलटण संघाला प्ले ऑफचं तिकीट मिळालेलं आहे. हरियाणा स्टिलर्सने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सवर ३७-२७ अशी मात केली. या पराभवामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या जयपूरच्या मनसुब्यांना धक्का बसलाय.
बचावपटूंची निराशा हे जयपूरच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं. अनुभवी कर्णधार मनजीत छिल्लर, सोमवीर शेखर हे खेळाडू सामन्यात चमक दाखवू शकले नाही. दोघांनीही मिळून सामन्यात अवघ्या २ गुणांची कमाई केली. ज्याचा मोठा फटका जयपूरच्या चढाईपटूंना बसला. जसवीर सिंहला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आल्यामुळे चढाईची जबाबदारी ही तुषार पाटील आणि पवन कुमार या खेळाडूंवर पडली. या दोन्ही खेळाडूंनी सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
हरियाणाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत जयपूरला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. चढाईच वझीर सिंह, प्रशांत कुमार राय आणि दिपक दहिया यांनी मिळून जयपूरची बचावफळी उध्वस्त केली. या तिनही खेळाडूंच्या झंजावातापुढे जयपूरचे खेळाडू तग धरु शकले नाहीत. बचावात हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंना फारसं कौशल्य दाखवता आलं नाही. मात्र कर्णधार सुरिंदर नाडाने एकट्याने ८ गुणांची कमाई करत आपल्या इतर खेळाडूंची कसर भरुन काढली.