प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला यंदा मोठ्या दिमाखात सुरुवात झालेली आहे. यंदा या स्पर्धेचा कालावधी ३ महिन्यांचा असल्यामुळे या स्पर्धेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल अशी अनेकांच्या मनात शंका होती. मात्र या सर्वा शंका-कुशंकांना मागे सारत प्रो-कबड्डीने क्रिकेटलाही मागे टाकत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. यू मुम्बा हा प्रो-कबड्डीच्या आतापर्यंतच्या पर्वांमधला सर्वाधीक यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो, मात्र आतापर्यंतच्या पर्वात मुम्बाची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिलेली नाहीये. ६ सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये यू मुम्बाचा संघ विजयी झाला असून इतर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. या कामगिरीमुळे ‘अ’ गटात मुम्बाचा संघ पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
अवश्य वाचा – अनुपचं स्वप्न साकार, क्रिकेटला मागे टाकत कबड्डी पहिल्या क्रमांकाचा खेळ!
मात्र येणारा काळ हा आमचाच असेल असा निर्धार आता यू मुम्बाच्या संघाने केलेला आहे. २५ ऑगस्टपासून यू मुम्बा आपल्या घरच्या मैदानावर सलग सहा सामने खेळेल. याआधी घरच्या मैदानावर खेळताना मुम्बाचा इतिहास चांगला राहिलेला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर आम्हीच राजे ठरु असा आत्मविश्वास यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमार आणि प्रशिक्षक एदुचरी भास्करन यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतल्या सामन्यांआधी आज यू मुम्बाच्या संघाने पत्रकारांशी संवाद साधला.
“यंदाच्या पर्वात ४ नवीन संघांचा समावेश झालेला असल्यामुळे प्रत्येक संघावर चांगली कामगिरी करुन दाखवायचा दबाव राहणार आहे. यंदाच्या हंगामात आम्हाला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये हवीतशी कामगिरी करता आली नाही. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही, या परिस्थितीतूनही यू मुम्बा पुनरागमन करु शकते, त्या दर्जाचे खेळाडू आजही यू मुम्बाच्या संघात आहेत. त्यामुळे आगामी घरच्या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना नक्कीच बदल दिसेलं”, असं म्हणत प्रशिक्षक भास्करन संघाच्या कामगिरीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.
बचावफळी हा यंदाच्या पर्वात यू मुम्बासाठी कळीचा मुद्दा ठरलेला आहे. मुम्बाच्या संघात यंदा जोगिंदर नरवाल, डी. सुरेश यांच्यासारखे अनेक चांगले बचावपटू आहेत. मात्र त्यांना हवीतशी कामगिरी अजून दाखवता आलेली नाही. जोगिंदर नरवाल हा दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर गेला आहे. त्याच्याबदली रणजीत आणि सुरिंदर सिंह याला संघात जागा मिळाली. स्वत: कर्णधार अनुप कुमार सुरिंदरच्या कामगिरीवर समाधानी आहे. “मात्र सुरिंदर अजुनही लहान आहे, प्रत्यक्ष सामन्यात खेळताना मला त्याच्यावर सारखं नियंत्रण ठेवावं लागतं. प्रत्येक रेडर आला की त्याचा प्रयत्न असतो की मी त्याला टॅकल करेन. मात्र कबड्डीमध्ये असं करुन चालत नाही. समोरच्या खेळाडूचे राग-रंग बघून आपला डाव खेळावा लागतो. त्यामुळे सुरिंदरवर नियंत्रण ठेवणं हे माझ्यासाठी मोठं काम होऊन बसल्याचं”, कर्णधार अनुप म्हणाला.
या पर्वात तेलगू टायटन्स, बंगळुरु बुल्स आणि उत्तर प्रदेश योद्धाज या संघांचा घरच्या मैदानावरचा रेकॉर्ड खराब आहे. त्यात नवीन खेळाडूंच्या येण्याने यंदाचं पर्व हे अधिकचं चुरशीचं झालेलं आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रभरात येणारे गणपतीबाप्पा आपल्या संघाला नक्की यश देतील, असा आत्मविश्वास संघाचे मालक रॉनी स्क्रूवाला यांनी व्यक्त केला.