इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत यू मुम्बाने बंगळुरु बु्ल्सवर ४२-३० अशा फरकाने मात केली. काही प्रमाणात एकतर्फी झालेल्या या सामन्यात यू मुम्बाकडून विजयाचा शिल्पकार ठरला तो सांगलीचा काशिलींग अडके. त्याने सामन्यात चढाईत तब्बल १७ गुणांची कमाई करत आपल्या संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

पहिल्या सत्रापासून काशिलींग अडकेने बंगळुरुच्या उजव्या आणि डाव्या कोपऱ्यावरील बचावफळीला खिंडार पाडत आघाडी आपल्या संघाकडे कायम ठेवली. याचसोबत सतत बोनस पॉईंट घेत काशिलींगने यू मुम्बाच्या खात्यात गुणांची भर टाकली. काशिलींग अडकेच्या जोरावर बंगळुरुला पहिल्याच सत्रात दोनदा ऑलआऊट करण्यात यू मुम्बाला यश आलं. कर्णधार अनुप कुमारने ५ गुणांची कमाई करत काशिलींगला चांगली साथ दिली.

बचावफळीत यू मुम्बाच्या सुरिंदर सिंहने ६ गुणांची कमाई करत बंगळुरुच्या चढाईपटूंना सामन्यात फारस डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. सुरिंदरला बचावफळीतल्या इतर खेळाडूंनीही चांगली साथ दिली. कुलदीप सिंहने सामन्यात ३, हादी ओश्तनोकने २ गुण मिळवत सुरिंदरला चांगली साथ दिली. मोठ्या अंतराने आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या यू मुम्बाच्या जोगिंदर नरवालनेही सामन्यात बचावात २ गुण मिळवत आपलं पुनरागमन झोकात साजरं केलं.

बंगळुरु बुल्सकडून कर्णधार रोहीत कुमारने १२ गुणांची कमाई करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्याला हरिश नाईक आणि सुनील जयपाल यांनी ३-३ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र मुंबईच्या खेळापुढे त्यांची डाळ शिजली नाही. बचावफळीत रविंदर पेहेल आणि महेंदर सिंहने काही गुणांची कमाई करत यू मुम्बाच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही त्यांना अपयश आलं.

या विजयानंतर यू मुम्बाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी मुम्बाचा संघ आगामी सामन्यात कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

Story img Loader