आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या दबंग दिल्लीला यू मुम्बाकडून अटीतटीच्या लढतीत पराभव स्विकारावा लागला. ३०-२८ च्या फरकाने यू मुम्बाने विजय संपादीत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. यू मुम्बाकडून नवोदीत श्रीकांत जाधव आणि अनुभवी काशिलींग अडके यांनी बहारदार खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.
या सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रापासून दबंग दिल्लीने आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. पहिल्या काही मिनीटांमध्ये दबंग दिल्लीने यू मुम्बाला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेतली. मात्र काशिलींगच्या खेळीने मुम्बाने सामन्यात धडाकेबाज पुनरागमन करत दबंग दिल्लीला ऑलआऊट करत सामन्यात बरोबरी साधली.
श्रीकांत जाधवने सामन्यात चढाईत सर्वाधीक ११ गुणांची कमाई केली. त्याला काशिलींग अडकेने चढाई आणि बचावात मिळून ७ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात शब्बीर बापूला सामन्यात संधी देण्यात आली. मात्र त्याचा मैदानात फारसा वापर करण्यात आला नाही. सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघाची गुणसंख्या ही बरोबरीत सुरु होती. मात्र अखेरच्या क्षणी श्रीकांत जाधवने केलेली चढाई आणि काशिलींग अडकेने केलेली पकड या जोरावर यू मुम्बाने सामन्यात बाजी मारली.
दबंग दिल्लीने सुरुवातीच्या सत्रापासून यू मुम्बाला चांगली टक्कर देत सामन्यात रंगत निर्माण केली. अबुफजल मग्शदुलू आणि त्याचा इराणी साथीदार मिराज शेखने सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई केली. रोहीत बलियानने ४ गुणांची कमाई करत दोन्ही खेळाडूंना चांगली साथ दिली. दिल्लीकडून बचावफळीत सुनील कुमारने ४ गुणांची कमाई केली. त्याला बाजीराव-विराज-तपस या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ गुणाची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या क्षणी श्रीकांत जाधवला पकडण्याची केलेली घाई दिल्लीच्या बचावपटूंना चांगलीच नडली.
उपांत्य फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास दिल्लीला आपल्या घरच्या मैदानावरचे सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. मात्र सुरुवातच पराभवाने झाल्यामुळे आता दिल्लीला एखाद्या चमत्कारावर अवलंबून रहावं लागणार आहे.