श्रीकांत जाधव आणि काशिलींग अडके या दोन मराठमोळ्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमक चढाईच्या जोरावर यू मुम्बाने गतविजेत्या पाटणा पायरेट्सवर ५१-४१ अशी मात केली आहे. सुरुवातीपसून या सामन्यात यू मुम्बाने आपलं वर्चस्व राखलं होतं. मध्यंतरानंतर पाटणा पायरेट्सने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुम्बाने आपली सामन्यावरची पकड काही केल्या सैल होऊ दिली नाही.
अनुप कुमार आणि यू मुम्बासाठी आजच्या सामन्यातली सर्वात सकारात्मक बाब म्हणजे, अनुपव्यतिरीक्त अन्य चढाईपटूंनी आज सामन्यात चढाईचा भार सांभाळला. गेल्या काही सामन्यांमध्ये काशिलींग अडके आपल्या जुन्या फॉर्मात आलाय, आज काशिलींगने सामन्यात चढाईत सर्वाधिक १५ गुणांची कमाई केली. याव्यतिरीक्त श्रीकांत जाधवने केलेला खेळही नक्कीच कौतुकास पात्र होता. श्रीकांतने आज चढाई आणि बचावात मिळून १३ गुणांची कमाई केली. श्रीकांतने काशिलींगला तोडीस तोड साथ देत पाटण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पहिल्या सत्रात कर्णधार प्रदीप नरवालला काशिलींग-श्रीकांत जोडीने बाहेर ठेवलं.
काशिलींग आणि श्रीकांत व्यतिरीक्त आज दर्शन कादियाननेही ८ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात आपला हातभार उचलला. यू मुम्बाच्या बचावफळीला आज आपली करामत दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र सुरिंदर सिंहने ४ गुणांची कमाई करत सामन्यात आपली छाप सोडली. प्रदीप नरवालला सुरिंदरने केलेले डॅश हे दाद देण्याजोगे होते.
बचावफळीची निराशाजनक कामगिरी ही पाटण्याच्या पराभवाचं आजच्या सामन्यातलं कारण ठरली. सामन्याच्या पहिल्या सत्रात बचावफळीच्या ढिसाळ खेळामुळे यू मुम्बाने सामन्यात १० गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस मुम्बाने आपली आघाडी बऱ्यापैकी टिकवली होती. मात्र दुसऱ्या सत्रात प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत यांनी सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. प्रदीप नरवालने अनुप कुमार आणि सुरिंदर सिंहला आपलं लक्ष्य बनवत पाटणा पायरेट्ससाठी काही गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात पाटणा पायरेट्स यू मुम्बाला एकदा ऑलआऊट करण्यात यशस्वीही झाली. मात्र आपल्या खेळात पाटणा पायरेट्स सातत्य राखू शकली नाही.
हादी ओश्तनोक, सुरींदर सिंह या बचावपटूंनी अखेरच्या मिनीटांमध्ये यब मुम्बासाठी काही चांगल्या पकडी केल्या. तर काशिलींग आणि श्रीकांतने पुन्हा एकदा पाटणाच्या बचावफळीला खिंडार पाडत सामन्यात भक्कम आघाडी घेतली. या विजयानंतर यू मुम्बाने गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यांमध्ये असाच फॉर्म कायम राहिल्यास यू मुम्बा यंदाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे.