घरच्या मैदानात आज यू मुम्बाच्या चाहत्यांना पुन्हा एकदा निराश व्हावं लागलं. अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यू मुम्बाच्या संघाला दबंग दिल्लीकडून ३२-३३ अशा एका गुणाच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या यू मुम्बाने अखेरच्या सत्रात चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र बचावपटूंच्या क्षुल्लक चुकांपुढे चढाईपटूंनी केलेली सर्व मेहनत वाया गेली.

कर्णधार अनुप कुमारने सामन्यात चढाई आणि बचावात ११ गुणांची कमाई केली. पहिल्या सत्रात संघ पिछाडीवर पडलेला असताना अनुपच्या मॅरेथॉन रेडमुळेच मुम्बा दबंग दिल्लीशी बरोबरी करु शकला. दुसऱ्या सत्रात काशिलींग अडकेने ७ गुण मिळवत अनुप कुमारला चांगली साथ दिली. अंतिम सात जणांच्या संघात जागा मिळालेल्या श्रीकांत जाधवनेही ७ गुण मिळवत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र उजवा कोपरारक्षक सुरींदर सिंहच्या क्षुल्लक चुका यू मुम्बाला आजच्या सामन्यात महाग पडल्या.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीत रेफ्रींचे चुकीचे ‘पंच’, दिग्गज खेळाडू नाराज

दबंग दिल्लीकडून कर्णधार मिराज शेख आणि त्याचा इराणी साथीदार अबुफजल मग्शदुलूने चढाईत सर्वाधीक गुण मिळवले. मिराज आणि अबुफजलने एकत्र मिळून सामन्यात तब्बल १९ गुण मिळवले. पहिल्या सत्रात मुंबईची बचावफळी खिळखिळी करण्यात या दोन्ही इराणी खेळाडूंचा महत्वाचा वाटा होता. महत्वाची गोष्ट म्हणजे चढाईपटूंनी केलेल्या मेहनतीला दिल्लीच्या बचावपटूंनीही तितकीच चांगली साथ दिली. बाजीराव होडगे, विराज लांगडे यांच्या खेळामुळे मुम्बाच्या चढाईपटूंना फारसे गुण घेता आले नाही, आणि अखेरीस दिल्ली एका गुणाच्या फरकाने विजयी ठरली. प्रो-कबड्डीच्या इतिहासात दबंग दिल्लीचा यू मुम्बावर मिळवलेला हा दुसराच विजय ठरला आहे.

अवश्य वाचा – …म्हणून पुणेरी पलटण यू मुम्बापेक्षा सरस !

याआधी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या संघाने बंगळुरु बुल्सचा ३२-३६ असा पराभव केला. चढाईपटू आणि बचावपटूंनी एकत्र मिळून केलेल्या सांघीक कामगिरीच्या जोरावर या सामन्यात बंगाल वॉरियर्सला विजय मिळवता येणं सोपं झालं. कर्णधार सुरजित सिंहने आजच्या सामन्यात बचावात ८ गुण मिळवले, त्याच्या सहकारी बचावपटूंनीही या सामन्यात त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली. बचावफळीत कोरियाच्या जँग कून लीने सर्वाधीक ६, दिपक नरवालने ३, भुपिंदर सिंहने ३ गुणांची कमाई केली.

 

बंगालच्या भूपिंदर सिंहला पकडण्याचा प्रयत्न करताना बंगळुरु बुल्सचे खेळाडू

 

बंगळुरु बुल्सच्या बचावपटूंनी केलेला निराशाजनक खेळ त्यांच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरला. संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू रविंदर पेहलला या सामन्यात बचावात एकही गुण मिळवता आला नाही. इतर बचावपटूंनी आपल्या परीने बंगालच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरले. चढाईपटूंमध्ये कर्णधार रोहीत कुमार आणि गुरविंदर सिंहने ७ गुणांची कमाई केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशीच ठरले.

Story img Loader