प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तेलगू टायटन्समागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र अखेर संपलेलं आहे. लखनऊ येथे झालेल्या इंटर झोन सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सने यू मुम्बाचा पराभव केला आहे. या पर्वातला तेलगू टायटन्सचा हा दुसराच विजय ठरलेला आहे. यू मुम्बाने कालच्या सामन्यात पिछाडी भरुन काढत झुंजार खेळ करत सामना आपल्या नावे केला होता, मात्र आजच्या सामन्यात त्यांना हा करीष्मा पुन्हा करुन दाखवता आला नाही.
तेलगू टायटन्सच्या संघाने आज अष्टपैलू खेळ केला. चढाईपटूंनी केलेल्या आक्रमक खेळाला बचावपटूंनी तितकीच चांगली साथ दिली. त्यामुळे यू मुम्बाला या सामन्यात तेलगू टायटन्सने ३७-३२ अशी मात दिली.
तेलगू टायटन्सचा राहुल चौधरी फॉर्मात –
तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरी या सामन्यात चांगलाच फॉर्मात आलेला होता. आजच्या सामन्यात राहुलचे चढाईमध्ये १३ गुणांची कमाई केली. महत्वाची बाब म्हणजे राहुल चौधरीला आज निलेश साळुंखे आणि विकास यांच्याकडून हवी तशी साथ लाभली नाही. दोघांनाही मिळून आजच्या सामन्यात चढाईमध्ये केवळ ६ गुण मिळवता आले. मात्र राहुलने या सर्व गोष्टींची तमा न बाळगता आक्रमक खेळाच्या जोरावर तेलगूचं पारडं सामन्यात कायम वरती ठेवलं.
पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळून राहुलने यू मुम्बाच्या बचावफळीतल्या महत्वाच्या खेळाडूंना आपलं लक्ष्य बनवलं. सुरिंदर सिंहच्या आतताई खेळाचा फायदा घेत उजव्या कोपऱ्यातून अनेक महत्वाचे गुण राहुलने मिळवले. त्याच्या खेळीचं एकही उत्तर यू मुम्बाच्या बचावफळीकडे नव्हतं. त्यामुळे तेलगूचा सामन्यावर कायम वरचष्मा राहिलेला पहायला मिळाला.
सोमबीरच्या पोलादी पकडीपुढे यू मुम्बा गारद –
तेलगू टायटन्सच्या बचावफळीने आज आपल्या चढाईपटूंना तितकीच चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात बचावफळीचा हिरो ठरला तो सोमबीर. सोमबीरने यू मुम्बाच्या अनुप कुमार, शब्बीर बापू आणि काशिलींग अडके या महत्वाच्या खेळाडूंना टार्गेट करत मुम्बाच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. सामन्यात एकदाही मुम्बाचे चढाईपटू सोमबीरपुढे आत्मविश्वासाने उभे राहताना दिसत नव्हते. सोमबीरने आजच्या सामन्यात ८ गुणांची कमाई केली. विशाल भारद्वाजने ३ तर रोहीत राणाने १ गुण मिळत आजच्या सामन्यात आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.
अनुप-शब्बीरची एकाकी झुंज, काशिलींग-नितीन अपयशी –
काशिलींग अडके आणि नितीन मदने यांचं सामन्यामध्ये सतत अपयशी होणं हे सध्या यू मुम्बासाठी खूप धोकादायक ठरू पाहतंय. नितीन मदनेला पहिल्या सात जणांमध्ये खेळण्याची फार कमी वेळेला संधी मिळाली आहे. मात्र ज्यावेळेला ही संधी मिळाली, त्याचाही नितीनला पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. काशिलींगच्या कामगिरीतही सातत्य राहिलेलं नाहीये. त्यामुळे यू मुम्बाच्या चढाईचा सगळा भार हा कर्णधार अनुप कुमारच्या खांद्यावर येतो.
आजच्या सामन्यातही अनुप कुमारने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं होतं. त्याला दुसऱ्या सत्रात शब्बीर बापूने चांगली साथ देत सामन्यात बरोबरीही साधली होती. मात्र दोघांनाही इतर चढाईपटूंनी तितकशी चांगली साथ न मिळाल्यामुळे या सामन्यात तेलगू टायटन्सने बाजी मारली.
उतावळी बचावफळी मुम्बासाठी चिंतेचा विषय –
सुरिंदर सिंह हा यू मुम्बासाठी बचावफळीता आतापर्यंतचा यशस्वी खेळाडू ठरलेला आहे. आजच्या सामन्यातही सुरिंदरने काही चांगले पॉईंट मिळवले. मात्र सामन्यात सुरिंदरने केलेला उतावळेपणा मुम्बाला मारक ठरला. सामन्यात अनेक वेळा सुरिंदरने तेलगू टायटन्सच्या चढाईपटूंना मध्य रेषेवर पकडण्याची चूक केली. याचा फायदा घेत तेलगूने सामन्यात आपल्याकडे आघाडी कायम ठेवली होती.
सुरिंदरचा खेळ प्रत्येक सामन्यात बहरत असला तरीही त्याच्या उतावळेपणावर नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं होऊन बसलेलं आहे. कित्येकदा हातात असलेला सामना सुरिंदरच्या उतावळेपणामुळे प्रतिस्पर्ध्याच्या हातात गेलेला आहे. आजच्या सामन्यात सुरिंदरने ४ गुणांची कमाई केली, मात्र त्याला इतर बचावपटूंची तितकीशी चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे तेलगूच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्यात मुम्बाला अपयश आलं.
७ पेक्षा कमी गुणांच्या फरकाने यू मुम्बाने हा सामना गमावला असल्यामुळे या सामन्यातून त्यांनी एक गुण कमावला आहे. मात्र आगामी सामन्यांमध्ये आपल्या कमजोर दुव्यांवर अधिक काम करण्याची मोठी जबाबदारी मुम्बाच्या संघ व्यवस्थापनावर असणार आहे.
दुसरीकडे तेलगू टायटन्सने कौतुकास्पद खेळ केला. सतत होणाऱ्या पराभवांचं दडपण न घेता तेलगूने आज यू मुम्बाच्या संपूर्ण संघाला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यात राहुल चौधरीने केलेल्या मेहनतीला इतर चढाईपटू आणि बचावपटूंनी साथ दिल्यामुळे सामन्यात तेलगू टायटन्सची बाजू कायम वरचढ राहिली.