चढाईपटूंचं वर्चस्व राहिलेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाने बंगाल वॉरियर्सला बरोबरीत रोखत आपला पराभव टाळला आहे. अखेरच्या सेकंदात कर्णधार नितीन तोमरने केलेल्या चढाईमुळे उत्तर प्रदेशने बंगालला २६-२६ अशा बरोबरीत रोखलं.
दोन्ही संघांच्या तुलनेमध्ये बंगाल वॉरियर्सच्या खेळाडूंनी आज उजवा खेळ केला. उत्तर प्रदेशने घेतलेली आघाडी मोडून काढत बंगालने सामन्यात आघाडी घेतली. यात मणिंदर सिंह, जँग कून ली आणि विनोद कुमार यांनी चढाईत बंगालला गुण मिळवून देत सामन्यात आपलं अस्तित्व कायम राखलं. विशेषकरुन मणिंदरने पहिल्या सत्रात उत्तर प्रदेशकडे असलेली आघाडी मोडून काढण्यात मोठा वाटा उचलला. फॉर्मात नसलेल्या उत्तर प्रदेशच्या बचावफळीला मणिंदरले लक्ष्य केलं. त्याला जँग कून ली आणि विनोद कुमारची उत्तम साथ लाभली.
बंगालच्या बचावपटूंनीही आज आपल्या चढाईपटूंना तोलामोलाची साथ दिली. कर्णधार सुरजित सिंहने आजच्या सामन्यात बचावात ५ गुण मिळवले. त्याला श्रीकांत तेवतिया आणि रण सिंहने प्रत्येकी १-१ गुण मिळवत चांगली साथ दिली.
उत्तर प्रदेशकडून नितीन तोमरचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला आपल्या कामगिरीत सातत्य दाखवता आलेलं नाही. नितीन तोमरने चढाईत १० गुणांची कमाई केली. मात्र अष्टपैलू राजेश नरवालला सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. त्यात रिशांक देवाडीगालाही दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या सुरिंदर सिंह आणि महेश गौडने दुसऱ्या सत्रात चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र बंगालच्या खेळाडूंनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही.
अखेरच्या क्षणी कर्णधार नितीन तोमरने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाला बरोबरी मिळवून दिली. हा सामना बरोबरीत सुटल्याने बंगाल वॉरियर्स अजुनही आपल्या मैदानावर अजिंक्य राहिलेला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.