हरियाणाच्या मोतीलाल नेहरू स्पोर्ट्स क्लबवर खेळण्यात आलेल्या प्रो-कबड्डीच्या सामन्यांमधील सलग दुसरा सामना बरोबरीत सुटला. फॉर्मात असलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला उत्तर प्रदेश योद्धाजने ३०-३० अशा बरोबरीत रोखलं.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पिछाडी भरुन काढत पाटण्याची सामन्यात बरोबरी
गुजरातचा फॉर्मात असलेला सचिन आजच्या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. आजच्या सामन्यात त्याला चढाईत एकही गुणाची कमाई करता आली नाही. मात्र कर्णधार सुकेश हेगडे, बदली खेळाडू पवन शेरावत यांनी सचिनची कसर भरुन काढली. सुकेश हेगडेच्या खेळामुळे गुजरातने सामन्यात काही क्षणांसाठी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या बाजूने उत्तर प्रदेशचा संघही तोडीस तोड खेळ करत असल्यामुळे गुजरातला मोठी आघाडी घेणं जमत नव्हतं.
गुजरातच्या भरवशाच्या बचावफळीने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही. फैजल अत्राचली, अबुझार मेघानी यांनी सामन्यात काही गुणांची कमाई केली. मात्र संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. गुजरातच्या याच थंड पडलेल्या बचावफळीचा फायदा उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंनी घेऊन सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं.
उत्तर प्रदेशकडून कर्णधार नितीन तोमर, मुंबईकर रिशांक देवाडीगा यांनी चढाईत संघाची बाजू सांभाळली. नितीने सामन्यात ८ तर रिशांकने ६ गुणांची कमाई केली. त्यांना इतर खेळाडूंनीही चांगली साथ दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या सत्राच्या अखेरीस उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचं काम गुजरातच्या बचावपटूंना जमलं नाही. त्यामुळे मोक्याच्या क्षणी गुजरातच्या महेंद्र राजपूतची पकड करत उत्तर प्रदेशने सामन्यात बरोबरी साधली.
उत्तर प्रदेशकडून बचावफळीत आज जीवाकुमारने ५ गुणांची कमाई केली. त्याला नितीश कुमारनेही ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. बचावपटूंनी आपल्या चढाईपटूंना दिलेल्या उत्तम सहकार्यामुळे अखेर उत्तर प्रदेशने या सामन्यात बरोबरी साधली आहे. इंटर झोन खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अ गटात गुजरात अद्यापही आपल्या पहिल्या स्थानावर कायम आहे. तर ब गटात उत्तर प्रदेश योद्धाजने तिसरा क्रमांक पटकावला आहे.