प्रो-कबड्डीत मुंबईतील एनएससीआयच्या मैदानात बाद फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाटण्याने हरियाणाच्या संघाचा धुव्वा उडवला. ६९-३० अशा फरकाने सामना जिंकत पाटणा पायरेट्स संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी पाटणा पायरेट्सला पुणेरी पलटण संघाचा सामना करावा लागणार आहे. कालच्या सामन्यात पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवालने आक्रमक खेळ करत चढाईत तब्बल ३४ गुणांची कमाई केली. प्रदीपच्या या खेळीला मोनू गोयतने १० गुण मिळवत चांगली साथ दिली. एका सामन्यात चढाईत सर्वाधीक गुण मिळवण्याचा बंगळुरु बुल्सच्या रोहित कुमारचा विक्रम कालच्या खेळीत प्रदीपने मोडला. याआधी काशिलींग अडके आणि रिशांक देवाडीगाच्या नावावर हा विक्रम होता.

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा स्टिलर्सच्या संघाने आपला पराभव मान्य केला. “होय, आमच्या खेळाडूंनी सामन्यात हार मानली होती. विशेषकरुन दुसऱ्या सत्रात प्रदीपने केलेल्या खेळीचं कोणतही उत्तर आमच्या बचावफळीसमोर नव्हतं. त्यामुळे प्रदीप चढाईसाठी आल्यानंतर केवळ गुण बहालं करणं एवढचं काम आमच्या बचावपटूंनी केलं. स्पर्धेच्या इतक्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन बचावपटूंकडून असा खेळ होणं अपेक्षित नव्हतं. मात्र प्रदीपने केलेला खेळ हा खरचं वाखणण्याजोगा होता.”

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गतविजेत्या पाटण्याकडून हरियाणाचा धुव्वा

संपूर्ण स्पर्धेत हरियाणाचा बचाव सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लरवर अवलंबुन राहिला. एखाद्या सामन्यात जर दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला सक्षम पर्याय निर्माण होणं गरजेचं नव्हतं का? लोकसत्ता ऑनलाईनने विचारलेल्या या प्रश्नावर हरियाणाच्या प्रशिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “होय, सुरिंदर आणि मोहीत छिल्लवर अवलंबुन राहणं ही आमची सर्वात मोठी चुक होती. या दोघांनाही सक्षम पर्याय उभे करायला हवे होते. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर मी स्वतः प्रशिक्षक म्हणून खूश नाहीये. मात्र हे दोन्ही खेळाडू आमच्या संघातले सिनीअर खेळाडू आहेत. त्यांच्याकडे बचावाचा बक्कळ अनुभव आहे. सुरिंदरने काही सामन्यात आपली चुणूक दाखवलीच आहे. मोहीत यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे हवतसं खेळू शकला नाही. पण एखादी स्पर्धा म्हणली की या गोष्टी होतचं राहतात”, असं म्हणतं त्यांनी आपल्या संघाचं कौतुकही केलं.

या पराभवासोबत हरियाणा स्टिलर्सचा प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामातला प्रवास संपुष्टात आला आहे. पदार्पणाच्या पर्वात या संघाने केलेली कामगिरी ही भल्याभल्यांना चकीत करणारी ठरली. यू मुम्बा, जयपूर पिंक पँथर्स यासारख्या संघांना धोबीपछाड देत हरियाणाचा संघ बाद फेरीत दाखल झाला होता. मात्र गतविजेत्या पाटण्याने त्यांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. त्यामुळे पुढच्या हंगामात हरियाणाचा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

Story img Loader