प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात घरच्या मैदानावर खेळत असणाऱ्या तामिळ थलायवाज संघाला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तेलगू टायटन्सने तामिळ थलायवाजवर ३३-२८ अशी मात करत यंदाच्या हंगामातला आपला पहिला विजय नोंदवला आहे. चढाईपटूंचा आक्रमक खेळ आणि त्याला बचावपटूंनी दिलेली भक्कम साथ हे तेलगू टायटन्सच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. दुसरीकडे तामिळ थलायवाजनेही तेलगू टायटन्सच्या तोडीस तोड खेळ केला, मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे तेलगू टायटन्सने सामन्यात बाजी मारली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : दिल्ली विरुद्ध गुजरात सामना बरोबरीत
तेलगू टायटन्स कडून राहुल चौधरी, मोहसीन मग्शदुलू आणि निलेश साळुंखे यांनी चढाईत सर्वोत्तम कामगिरी बजावली. महत्वाच्या क्षणी तेलगूच्या चढाईपटूंनी तामिळ थलायवाज संघाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. दुसऱ्या बाजूने अबुझार मिघानी, विशाल भारद्वाज आणि अनिल कुमार यांनी तेलगू टायटन्सच्या चढाईपटूंना मोलाची साथ दिली. तामिळ थलायवाजकडूव कर्णधार अजय ठाकूरनेही चढाईत ९ गुणांची कमाई केली. त्याला दुसऱ्या बाजूने अतुल एम.एस. ने चांगली साथ दिली. बचावफळीत अमित हुडाने ६ गुणांची कमाई करत शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या क्षणी बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे तामिळ थलायवाजने तेलगू टायटन्सला सामना बहाल केला.