प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम हा कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईसाठी चांगलाच संस्मरणीय ठरणार असं दिसतं आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी तेलगू टायटन्स संघाने सिद्धार्थवर १ कोटी ४५ लाखांची बोली लावली. सातव्या हंगामातला सिद्धार्थ सर्वात महागडा खेळाडू ठरला. यानंतर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सिद्धार्थचा मोठा भाऊ सूरज देसाईलाही तेलगू टायटन्स संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. सूरजवर तेलगू टायटन्सने १० लाखांची बोली लावली आहे. त्यामुळे सातव्या हंगामात सिद्धार्थ आणि सूरज हे देसाई बंधू तेलगू टायटन्स संघाकडून खेळताना दिसू शकतात.

अवश्य वाचा – भावाच्या पाठबळामुळेच कबड्डीवर पुन्हा पकड!

काही दिवसांपूर्वी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थने आपल्या कबड्डीतल्या यशाचं श्रेय आपला भाऊ सूरजला दिलं होतं. सिद्धार्थ आणि सूरज हे देसाई बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील हुंडळेवाडी गावचे. सूरज मोठा आणि सिद्धार्थ शेंडेफळ. सूरज काही महिन्यांपूर्वी सिन्नरला झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत चमकत असताना सिद्धार्थ प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात गुणांचे इमले बांधत होता. त्यामुळेच हे कबड्डीपटू भाऊ चर्चेत आहेत. सूरजचे कौशल्य सिद्धार्थने बारकाईने आत्मसात केले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या भावांपैकी नेमका कोण खेळतो आहे, हा प्रश्न पडतो.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 7 – १ कोटी ४५ लाखांचं करणार काय??? सिद्धार्थ म्हणतो…

सूरजविषयी सिद्धार्थ म्हणतो, “वडील शेतकरी असल्याने आर्थिक स्थर्य होते. भाऊ नोकरीला लागला, तेव्हा चांगले दिवस आले. खेळ आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर सूरज मला मार्गदर्शन करतो. खेळताना चुका होतात, त्यासंदर्भात फोनवरून कानमंत्र देतो.” प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या हंगामांमध्ये सेनादलाच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सूरजला या व्यासपीठावर खेळता आले नाही. मग पाचव्या हंगामासाठी त्याची दबंग दिल्लीकडून निवड झाली. परंतु सरावात दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली. अखेरीस सातव्या हंगामात सूरज पुन्हा एकदा प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावर पुनरागमन करतो आहे. त्यामुळे या दोन्ही भावांना तेलगू टायटन्स एकाच वेळी संघात जागा देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – ….आणि नाचायलाच लागलो, कोट्यवधी रुपयांच्या बोलीनंतर सिद्धार्थ देसाईची पहिली प्रतिक्रीया