प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने आपला ठसा उमटवला. १ कोटी ४५ लाखांची बोली लावत सिद्धार्थने पहिल्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मात्र सातव्या पर्वात सिद्धार्थ यू मुम्बाऐवजी तेलगू टायटन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. सहाव्या पर्वात यू मुम्बाचा सदस्य असलेल्या सिद्धार्थला यंदा संघाने कायम राखलं नव्हतं. लिलावाच्या पहिल्या दिवशी सिद्धार्थची किंमत ३० लाख ठरवण्यात आली होती. मात्र तेलगू टायटन्सने सर्वांना मागे टाकत सिद्धार्थसाठी थेट १ कोटी रुपयांची बोली लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – Pro Kabaddi – 7 Auction : कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू

यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स संघात संघर्ष पहायला मिळाला. मात्र तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं. यू मुम्बाकडे ‘फायनल बिड टू मॅच’ कार्डाद्वारे सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्याची संधी होती. मात्र इथेही यू मुम्बाने सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सिद्धार्थ देसाईचं तेलगू टायटन्सकडून खेळणं निश्चीत झालं आहे. लिलाव झाल्यानंतर सिद्धार्थने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इतक्या मोठ्या रकमेचं करणार काय असं विचारलं असतान सिद्धार्थने अतिशय समर्पक उत्तर दिलं.

“या वर्षी मी माझ्या गावातल्या मुलांचा कबड्डी प्रशिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हालाखीच्या परिस्थीतून मी आणि माझं कुटुंब वर आलं, यावेळी कबड्डीनेच मला मदत केली आहे. यू मुम्बाकडून खेळत असताना मला बक्षीसाची जी रक्कम मिळत गेली, त्यातून मी घर सावरण्याचं काम केलं. आता या पर्वात मी गावातल्या मुलांचा कबड्डी प्रशिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.” सिद्धार्थने आगामी काळासाठी आपले इरादे स्पष्ट केले.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 7 – कोल्हापूरचा सिद्धार्थ देसाई पहिल्याच प्रयत्नात करोडपती, १ कोटी ४५ लाखांची बोली

“मी, माझा भाऊ आणि मित्रमंडळी मुंबईत खास लिलावासाठी आलो होतो. मला स्वतःला ७०-८० लाखांची बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण तेलगू संघाने जेव्हा माझ्यासाठी १ कोटी रुपयांची बोली लावली, ते पाहून मी नाचायलाच लागलो. इतकी मोठी रक्कम माझ्यावर लावली जाईल याचा मला जराही अंदाज नव्हता. मात्र माझ्यावर दाखवण्यात आलेला विश्वास या हंगामात मी १०० टक्के खरा करून दाखवेन.” सातव्या हंगामासाठी आपण तयारीही सुरु केल्याचं सिद्धार्थने आवर्जून सांगितलं.

अवश्य वाचा – ….आणि नाचायलाच लागलो, कोट्यवधी रुपयांच्या बोलीनंतर सिद्धार्थ देसाईची पहिली प्रतिक्रीया

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 7 auction siddarth desai revel his plan after becoming richest player in day