प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या बंगाल वॉरियर्स संघाने पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. प्रतिस्पर्धी यूपी योद्धा संघावर ४८-१७ अशा फरकाने मात करत बंगालने प्रो-कबड्डीच्या इतिहासातील आपल्या संघाच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. ३१ गुणांच्या फरकाने बंगाल वॉरियर्सने हा सामना जिंकला.

बंगाल वॉरियर्सने आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळाची नोंद केली. चढाई आणि बचाव या दोन्ही क्षेत्रांमध्ये बंगालचा संघ यूपी योद्धापेक्षा सरस ठरला. चढाईमध्ये मोहम्मद नबीबक्ष, मणिंदर सिंह आणि के. प्रपंजन या खेळाडूंनी एकत्र मिळून २४ गुणांची कमाई केली. नबीबक्षने सर्वाधिक १० गुण मिळवले. बंगालच्या बचावफळीनेही आपल्या चढाईपटूंना चांगली साथ देत यूपी योद्धा संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.

यूपी योद्धा संघाला आजच्या सामन्यात रिशांक देवाडीगाची अनुपस्थिती चांगलीच जाणवली. रिशांकच्या अनुपस्थितीत मोनू गोयत आणि सुरिंदर सिंह यांनी चढाईत काही गुणांची कमाई केली. श्रीकांत जाधव आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. यूपी योद्धाच्या बचावपटूंनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. मध्यरेषेवर चढाईपटूला पकडण्याच्या प्रयत्नात यूपीने अनेक गुण बंगाल वॉरियर्सला बहाल केले.

Story img Loader