प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात हरयाणाने गुजरातवर ४१-२५ ने मात केली. बचावफळीचं अपयश आजच्या सामन्यात गुजरातला पुन्हा एकदा महागात पडलं. हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच हरयाणाने सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलेलं होतं. गुजरातचे खेळाडू हरयाणाच्या चढाईपटूंपुढे तग धरु शकले नाहीत. गेले दोन हंगाम भक्कम बचावाच्या जोरावर अंतिम फेरी गाठणारा गुजरातचा संघ या हंगामात पूर्णपणे उघला पडला आहे. उजव्या आणि डाव्या कोपऱ्यातून होणाऱ्या चढायांवर रोख लावणं गुजरातच्या बचावफळीला जमलं नाही. ऋतुराज कोरावी, परवेश भैंसवाल, सुनील कुमार हे बचावपटू हरयाणाविरुद्धच्या सामन्यात अजिबात छाप पाडू शकले नाहीत. गुजरातकडून बचावफळीत अबुफजल मग्शदुलू, जी.बी. मोरे यांनी चांगली कामगिरी केली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.
हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. विकास कंडोला, प्रशांत कुमार राय आणि विनय या चढाईपटूंनी आक्रमक चढाया करत गुजरातच्या बचावफळीला खिंडार पाडलं. या आक्रमक खेळापुढे गुजरातचा संघ तग धरु शकला नाही. बचावफळीत रवी कुमार आणि विकास काळेनेही काही चांगल्या पकडी करत गुजरातच्या चढाईपटूंचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामना संपायला काही मिनीटं बाकी असताना गुजरातने चांगलं पुनरागमन केलं होतं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या पराभवानंतर गुजरात गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.