प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात सिद्धार्थ देसाईने आपली गुणवत्ता सिद्ध करत, पहिल्या दिवशी कोट्यवधी रुपयांची बोली मिळवण्याचा मान मिळवला आहे. सहाव्या पर्वात यू मुम्बाकडून खेळणारा सिद्धार्थ सातव्या हंगामात तेलगू टायटन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. यू मुम्बाने सिद्धार्थला सातव्या हंगामात कायम राखलं नव्हतं. पहिल्या दिवशीच्या लिलावात सिद्धार्थची किंमत ३० लाख ठरवण्यात आली होती. मात्र तेलगू टायटन्सने सर्वांना मागे टाकत सिद्धार्थसाठी थेट १ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स संघात संघर्ष पहायला मिळाला. मात्र तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं. यू मुम्बाकडे ‘फायनल बिड टू मॅच’ कार्डाद्वारे सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्याची संधी होती. मात्र इथेही यू मुम्बाने सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सिद्धार्थ देसाईचं तेलगू टायटन्सकडून खेळणं निश्चीत झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बोलीनंतर सिद्धार्थने पत्रकारांशी संवाद साधताना आपला आनंद व्यक्त केला. “मी, माझा भाऊ आणि मित्रमंडळी मुंबईत खास लिलावासाठी आलो होतो. मला स्वतःला ७०-८० लाखांची बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण तेलगू संघाने जेव्हा माझ्यासाठी १ कोटी रुपयांची बोली लावली, ते पाहून मी नाचायलाच लागलो. इतकी मोठी रक्कम माझ्यावर लावली जाईल याचा मला जराही अंदाज नव्हता. मात्र माझ्यावर दाखवण्यात आलेला विश्वास या हंगामात मी १०० टक्के खरा करून दाखवेन.” सातव्या हंगामासाठी आपण तयारीही सुरु केल्याचं सिद्धार्थने आवर्जून सांगितलं.

सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून खेळताना सिद्धार्थने सर्वोत्कृष्ट उदयोनमुख खेळाडूचा मान पटकावला होता. मात्र सातव्या हंगामासाठी मुम्बाने त्याला आपल्या संघात कायम न राखल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 7 i started dancing says siddarth desai after winning 1 corer 45 lakh bid from telgu titans