अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात, तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने, प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. ३०-२९ अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने सामना जिंकला.

पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. राहुल चौधरी, अजय ठाकूर यांनी अत्यंत चतुराईने चढाया करत दिल्लीच्या बचावफळीतील कमकुवत बाजूंवर प्रहार केला. उजव्या कोपऱ्यातील रविंद्र पेहल आणि राईट कव्हर विशाल माने तामिळ थलायवाजच्या चढाईपटूंवर अंकुश ठेऊ शकले नाहीत. जोगिंदर नरवाल आणि मिराज शेख यांनी पहिल्या सत्रात दिल्लीकडून चांगली झुंज दिली. दुसऱ्या बाजूला तामिळ थलायवाजने अष्टपैलू खेळ केला. चढाईपटूंसोबत बचावफळीत मनजीत छिल्लर, मोहीत छिल्लर यांनी महत्वाचे गुण कमावत आपल्या संघाची आघाडी कायम राखण्यात मोलाचा वाटा उचलला. मध्यांतरापर्यंत तामिळ थलायवाजचा संघ १८-११ अशा फरकाने आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात दबंद दिल्लीने चांगलं पुनरागमन केलं. इराणी खेळाडू मिराज शेखने चढाईमध्ये महत्वाच्या गुणांची कमाई केली. तामिळ थलायवाजच्या भक्कम बचावफळीला खिंडार पाडत दिल्लीने दुसऱ्या गुणात गुणांची कमाई केली. मात्र बचावफळीतल्या खेळाडूंचं अपयश दिल्लीला सामन्यात आघाडी घेऊ देत नव्हत. उजव्या कोपऱ्यातला अनुभवी खेळाडू रविंद्र पेहल आजच्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने आपल्या अनुभवाचा आणि उंचीचा फायदा घेत रविंद्र पेहलला संघाबाहेर ठेवलं.

मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याची संधी गमावली. याचा फायदा घेत एका क्षणाला सर्वबाद होण्याच्या काठावर आलेल्या तामिळ थलायवाज सामन्यात दमदार पुनरागमन केलं. तामिळ थलायवाजच्या बचावफळीने मिराज शेखची सुंदर पकड करत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : पराभवाची हॅटट्रीक होऊनही तेलगू टायटन्स संघाची विक्रमी कामगिरी

मात्र सामना संपायला २-३ मिनीटं बाकी असताना दिल्लीच्या नवीन कुमारने केलेल्या एका चढाईमुळे सामन्याचं चित्र संपूर्णपणे पालटलं. एका चढाईत ३ गुणांची कमाई करत नवीनने दिल्लीची पिछाडी कमी केली. यानंतर तामिळ थलायवाजच्या अखेरच्या चढाईपटूची सुरेख पकड करत दबंग दिल्लीने २९-२९ अशी बरोबरी साधली. दबंग दिल्लीसाठी सामन्यातली अखेरची चढाई करो या मरोची असताना, मनजीत छिल्लरचा पाय अंतिम रेषेच्या बाहेर पडला. या क्षुल्लक चुकीच्या जोरावर तामिळ थलायवाजने आपल्या हातात आलेला सामना दिल्लीच्या पदरात टाकला. दिल्लीकडून दुसऱ्या सत्रात नवीन कुमारने आश्वासक खेळी केली.

Story img Loader