अखेरच्या चढाईपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेरीस यू मुम्बाने पुणेरी पलटणला बरोबरीत रोखण्यामध्ये यश मिळवलं. दोन्ही संघांमधला सामना ३३-३३ अशा बरोबरीत सुटला. पुणेरी पलटणकडून चढाईत मनजीत सिंह आणि बचावफळीत बाळासाहेब जाधव यांनी आश्वासक खेळ केला. यू मुम्बाकडून चढाईत अभिषेक सिंह आणि बचावफळीत संदीप नरवाल चमकले. या सामन्यानंतर यू मुम्बा गुणतालिकेत सहाव्या स्थानावर कायम राहिला आहे, तर पुणेरी पलणट दहाव्या स्थानावर पोहचला आहे.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला दोन्ही संघ हे सावध पवित्रा घेऊन खेळत होते. मात्र काही क्षणांमध्येच यू मुम्बाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. सामन्यात ८ व्या मिनीटीला पुणेरी पलटणला सर्वबाद करत यू मुम्बाने ११-५ अशी आघाडी घेतली. यू मुम्बाकडून चढाईमध्ये अभिषेक सिंह आणि अतुल एम.एस यांनी चांगले गुण कमावले. महत्वाची गोष्ट म्हणजे पुणेरी पलटणच्या बचावफळीतील त्रुटींचा यू मुम्बाने चांगला फायदा उचलला. मात्र काही क्षणांमध्येच पुणेरी पलटणकडून मनजीतने आक्रमक खेळ करत यू मुम्बाची आघाडी कमी केली. तरीही पहिल्या सत्राअखेरीस यू मुम्बा १६-१२ ने आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. बाळासाहेब जाधवने बचावफळीत यू मुम्बाच्या महत्वाच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवलं. मनजीतने चढाईमध्येही महत्वपूर्ण गुणांची कमाई करत पुणेरी पलटणला सामन्यात बरोबरी साधून दिली. यू मुम्बाकडून अभिषेक सिंह आणि पुणेरी पलटणकडून मनजीत यांच्यात चांगलंच द्वंद्व सुरु होतं. दुसऱ्या सत्रात अखेरच्या मिनीटांमध्ये मनजीतने चढाईत भरघोस गुणांची कमाई करत पुण्याला आघाडी मिळवून दिली. मात्र अभिषेकने पुन्हा एकदा यू मुम्बाला बरोबरी साधून दिली. अखेरीस दोन्ही संघांनी ३३-३३ अशा बरोबरीत समाधान मानलं.

Story img Loader