प्रो-कबड्डीचं सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाची गाडी सातव्या हंगामात काहीकेल्या रुळावर येताना दिसत नाहीये. शुक्रवारी बंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर ४१-२९ ने विजय मिळवला. सातव्या हंगामातला पाटणा पायरेट्सचा हा सलग सहावा पराभव ठरला आहे.
पहिल्या सत्रापासून यूपी योद्धाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ८ व्या मिनीटाला पाटणा पायरेट्सला सर्वबाद करत यूपी योद्धाने सामन्यात ९-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात यूपी योद्धाने सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. पाटणा पायरेट्सचा महत्वाचा चढाईपटू प्रदीप नरवालला मैदानाबाहेर ठेवण्यात यूपी योद्धाचा संघ यशस्वी ठरला. मात्र पहिल्या सत्राच्या अखेरीस पाटण्याकडून हादी ओश्तनोकने काही सुरेख पकडी करत पाटण्याची पिछाडी कमी केली. यानंतर प्रदीपनेही अखेरच्या मिनीटांमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत काही सुरेख गुण कमावले. पहिल्या सत्राच्या अखेरीस यूपी योद्धाने १६-१४ अशी दोन गुणांची निसटती आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात पाटणा पायरेट्सकडून प्रदीप नरवालने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत यूपी योद्धाला सामन्यात पहिल्यांदा सर्वबाद केलं. मोनूनेही प्रदीपला चांगली साथ दिली. या जोरावर पाटण्याने दुसऱ्या सत्रात बरोबरी साधली. मात्र मोक्याच्या क्षणी यूपी योद्धाच्या बचावपटूंनी प्रदीप नरवालची पकड करत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर यूपी योद्धाने पाटण्याला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच न देता १२ गुणांच्या फरकाने सामन्यात बाजी मारली.