प्रो-कबड्डीत दबंग दिल्ली संघाकडून खेळणारा महाराष्ट्राचा बचावपटू निलेश शिंदेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक कबड्डी सामन्यात निलेश शिंदेने एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी नेहरु नगर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात निलेश शिंदे दबंग दिल्ली संघाकडून खेळला होता. प्रो-कबड्डीव्यतिरिक्त निलेश शिंदे भारत पेट्रोलियम संघाकडूनही राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळतो.
नेमकं काय घडलं?
निलेश शिंदे आणि प्रो-कबड्डीच्या चौथ्या हंगामात बंगाल वॉरियर्स संघाला प्रशिक्षण देणारे प्रताप शेट्टी हे दोघेही नेहरु नगर परिसरातील शिवाजी मैदानात कबड्डी सामने पाहायला गेले होते. भांडुप येखील संरक्षण प्रतिष्ठान आणि कुर्ला परिसरातील स्वस्तिक क्रीडा संघामध्ये सामना खेळवला जात होता. यावेळी निलेश शिंदे स्वस्तिक क्रीडा संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजर होता. याचवेळी सतीश सावंत हा स्थानिक खेळाडू प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहत होता. संरक्षण प्रतिष्ठान विरुद्ध स्वस्तिक कुर्ला या संघांमध्ये संरक्षण प्रतिष्ठानच्या संघाने बाजी मारली. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सतीश सावंतने संरक्षण प्रतिष्ठानच्या खेळाडूंसाठी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सामना संपल्यानंतर सतीश सावंत संरक्षण प्रतिष्ठानच्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी गेला. याचा राग येऊन निलेश शिंदेने आपल्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर निलेशने आपला सहकारी प्रताप शेट्टी यांना बोलावलं आणि यानंतर दोघांनीही मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सावंत यांनी नेहरु नगर पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटलं आहे.
या मारहाणीदरम्यान निलेश शिंदेने आपल्या डोक्यात एका टणक वस्तूने प्रहार केला. यानंतर आपल्या डोक्यातून रक्त वाहायला लागल्याचंही सावंतने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकारानंतर सावंत यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. यानंतर सावंत यांनी नेहरु नगर पोलिसांत निलेश शिंदे आणि प्रताप शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन नेहरु नगर पोलिसांनी कलम ३२३, ३२४, ५०४ आणि ३४ कलमाअंतर्गत निलेश आणि प्रताप शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
अशा प्रकारच्या घटना या एखाद्या खेळाडूचं करियर संपुष्टात आणण्यासाठी पुरेशा असतात, त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही हंगामात निलेश शिंदेला आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. प्रो-कबड्डीच्या चौथ्या हंगामात निलेश अनेक सामने दुखापतीमुळे बाहेर होता. यंदाच्या हंगामात दबंग दिल्लीकडून खेळताना निलेश आपल्या खेळात सुधारणा करेल अशी सर्वांना आशा होती, मात्र निलेशला यंदाच्या पर्वातही फारशी चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. दबंग दिल्लीकडून निलेश शिंदेने यंदाच्या हंगामात १५ सामने खेळले, ज्यात निलेशला केवळ २४ गुणांची कमाई करता आली होती.