भारतीय संघाच्या सरावात अनुप कुमारच्या डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यू मुंबाच्या सरावासाठी तो एकसुद्धा दिवस हजेरी लावू शकला नाही. दोन दिवसांपूर्वीच तो मुंबईत दाखल झाला. पण शनिवारी त्याचा खेळ थक्क करणारा होता. ‘यहाँ के हम सिकंदर’ हे बोल अनुपने खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले. त्यामुळेच यजमान यू मुंबा संघाला ४५-३१ अशा फरकाने जयपूर पिंक पँथर्सला हरवून विजयी सलामी नोंदवता आली. दुसऱ्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाने दिल्ली दबंगला ४७-२७ असे हरवून आपले खाते उघडले.
अभिषेक बच्चनच्या जयपूर संघाची पाठराखण करण्यासाठी अनेक ताऱ्यांची पावले एनएससीआयकडे वळली, परंतु चाहत्यांचे मोठे पाठबळ यू मुंबाच्या बाजूने होते. यू मुंबा संघाने जयपूरचा कर्णधार नवनीत गौतमला जेरबंद करण्यासाठी चांगलीच व्यूहरचना आखली होती. पहिल्याच चढाईत त्याची पकड झाली. त्यानंतर अनुपच्या मैदानी अदाकारीने चाहते मंत्रमुग्ध झाले. पहिल्या सत्रात यू मुंबाने दोन लोणसहित २५-१२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात जयपूरने चांगली टक्कर दिली आणि एक लोणही चढवला. परंतु पिछाडी भरून काढणे त्यांना कठीण गेले.
यू मुंबाकडून अनुपने १५ चढायांपैकी ८ यशस्वी चढाया करीत एकंदर १२ गुणांची कमाई केली. शब्बीर बापूर शरफुद्दीनने ७ गुण घेत त्याला छान साथ दिली. जयपूरकडून मणिंदर सिंगने सर्वाधिक ११ गुण घेतले, तर जसवीर सिंगने ५ गुण मिळवले.
विजयानंतर यू मुंबाचे प्रशिक्षक रवी शेट्टी म्हणाले की, ‘‘जसवीर सिंग धोकादायक ठरणार, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही खास व्यूहरचना आखली होती.’’
दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू अजय ठाकूर आणि मनजीत चिल्लर (बंगळुरू) विरुद्ध काशिलिंग आडके (दिल्ली) यांच्यात खऱ्या अर्थाने लढत रंगली. परंतु बंगळुरू बुल्सच्या झंझावातापुढे दिल्लीची ‘दबंग’गिरी टिकू शकली. बंगळुरूने पहिल्या सत्रात २७-१३ अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. बंगळुरूच्या ठाकूरने १२ आणि चिल्लरने १० गुण कमवले. दिल्लीच्या आडकेने १४ चढायांमध्ये ६ गुण प्राप्त केले.

Story img Loader