प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सच्या विजयी रथाला आज पहिला ब्रेक लागला आहे. यूपी योद्धाजविरुद्धच्या सामन्यात पाटणाने २७-२७ अशी बरोबरी साधली आहे.

पाटणा पायरेट्सचा संघ प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वाचा विजेता संघ आहे. पाचव्या पर्वातली त्याने आपली ही विजयी घौडदौड कायम राखली होती. मात्र आज उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांना सुरुवातीच्या सत्रात कडवी लढत मिळाली. पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालच्या सर्व हालचालींचा अभ्यास उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनी केला होता. त्यामुळे सुरुवातीच्या सत्रापासून प्रदीप नरवाल यूपी योद्धाजच्या जाळ्यात अडकत गेला.

मात्र पाटण्याकडून रेडींगमध्ये मोनू गोयतने प्रदीप नरवालच्या अपयशाची सर्व कसर भरुन काढली. रेडींगमध्ये मोनू गोयतने ८ गुणांची कमाई करत संघांचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. त्याला विशाल माने आणि सचिन शिंगाडे यांनी चांगली साथ दिली. मात्र प्रदीपने आपल्या पहिल्या सत्रातलं अपयश दुसऱ्या सत्रात पूर्णपणे भरुन काढलं. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळून प्रदीप नरवालने सामन्यात रेडींगमध्ये ९ गुण मिळवले.

दुसरीकडे यूपी योद्धाजच्या रेडर्सने आज अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन घडवलं. कर्णधार नितीन तोमर, महेश गौड आणि रिशांक देवाडीगा यांनी सामन्यात मिळून १८ गुण मिळवले. त्याला बचापटूंचीही चांगली साथ लाभली. मात्र अखेरच्या सेकंदांमध्ये राजेश नरवालने केलेल्या चुकीमुळे पाटणा पायरेट्सला पंचांनी १ तांत्रिक गुण बहाल केला आणि पाटण्याने सामन्यात बरोबरी साधण्यात यश मिळवलं.

Story img Loader