लंडन : भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो लीगच्या युरोप दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात शनिवारी ग्रेट ब्रिटनवरही विजय मिळवला. कमालीच्या रंगतदार झालेल्या लढतीत भारताने नियोजित वेळेतील ४-४ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर ४-२ असा विजय मिळवला. या विजयानंतरही गुणतक्त्यात भारतीय संघ १२ सामन्यांत २४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रेट ब्रिटन ११ सामन्यांत २६ गुणांसह आघाडी टिकवून आहे.
नियमित वेळेत भारताकडून हरमनप्रीत सिंग (सातवे मिनिट), मनदीप सिंग (१९वे मिनिट), सुखजीत सिंग (२८वे मिनिट), अभिषेक (५०वे मिनिट) यांनी गोल केले. ग्रेट ब्रिटनसाठी चारही गोल सॅम वार्डने ८, ४०, ४७ आणि ५३व्या मिनिटाला केले. त्यानंतर शूटआऊटमध्ये ब्रिटनला भारताचा गोलरक्षक श्रीजेशला चकवता आले नाही. भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक यांनी गोल केले. ग्रेट ब्रिटनकडून पाच प्रयत्नांत केवळ विल कॅलनन आणि झॉचरी वॉलेसला गोल करण्यात यश आले. शिपर्ले रुपर्ट आणि रॉपर फिलचे प्रयत्न अपयशी ठरले.
भारताने पूर्वार्धात आक्रमक खेळ करताना ग्रेट ब्रिटनच्या बचाव फळीवर वर्चस्व राखले होते. मध्यंतराला भारताने ३-१ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ग्रेट ब्रिटनने तीन गोल नोंदवून वर्चस्व राखले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात भारताने अनेकदा पेनल्टी कॉर्नर स्वीकारले. परंतु याचा ग्रेट ब्रिटनला फायदा घेता आला नाही. ग्रेट ब्रिटनच्या बचाव फळीनेही भारतीय आक्रमकांना चांगले रोखले. त्यामुळे सामना नियोजित वेळेत बरोबरीत राहिला.