लंडन : कर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने प्रो लीग हॉकीमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला ५-१ असे पराभूत केले. प्रो लीगच्या युरोप दौऱ्यात सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला विजयी पुनरागमन करण्यात यश आले. भारताचा आज, शनिवारी ग्रेट ब्रिटनशी सामना होईल.
बेल्जियमविरुद्ध मध्यरक्षक विवेक सागर प्रसादने भारताला दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २० आणि ३०व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताची आघाडी वाढवली. भारताकडून अमित रोहिदास (२९व्या मि.) व दिलप्रीत सिंग (६०व्या मि.) यांनी अन्य दोन गोल केले. बेल्जियमचा एकमेव गोल विल्यम घिसलेनने ४६व्या मिनिटाला केला.
प्रो लीगच्या युरोप दौऱ्याला सुरुवात करताना भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर होता. मात्र, युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारताला बेल्जियम आणि ग्रेट ब्रिटनकडून पराभव पत्करावे लागले. दुसऱ्या टप्प्याला मात्र भारताने अप्रतिम सुरुवात केली. बेल्जियमविरुद्ध सुरुवातीलाच गोल केल्यावर संपूर्ण सामन्यात भारताने नियोजनबद्ध खेळ केला.