क्रिकेट, कबड्डी आणि अन्य खेळांसारखी आता कुस्तीचीही लीग सुरू करण्यात येणार आहे. कुस्तीपटूंना अधिकाधिक आर्थिक फायदा व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रो-कुस्ती लीग (पीडब्ल्यूएल) आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये दोनदा ऑलिम्पिक पदक मिळविणारा मल्ल सुशीलकुमार, कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू सहभागी होत आहेत.
प्रो स्पोर्टिफाय व भारतीय कुस्ती महासंघ यांच्यात या लीगबाबत करार झाला असून या लीगच्या बोध चिन्हाचे अनावरण शानदार सोहळ्यात करण्यात आले. ही लीग ८ ते २९ नोव्हेंबर दरम्यान देशातील सहा शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
सुशीलकुमारने या लीगचे समर्थन करताना सांगितले की, ‘‘या लीगद्वारे भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर लढत देण्याचा अनुभव मिळणार आहे. परदेशात न जाता भारतात राहूनच ही संधी मिळणार असल्यामुळे खेळाडूंचा वेळ व पैसा वाचणार आहे. पुढील वर्षी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ही लीग खूप फायदेशीर ठरणार आहे.’’
कुस्ती लीगपूर्वी अमेरिकेत प्रशिक्षण – सुशीलकुमार
कुस्ती प्रो-लीगसाठी मी अमेरिकेत प्रशिक्षण घेणार आहे, असे भारताचा अव्वल दर्जाचा कुस्तीपटू सुशील कुमारने येथे सांगितले.
लास व्हेगास येथे सप्टेंबरमध्ये जागतिक स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटू स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिरात भाग घेणार आहेत. सुशील जागतिक स्पर्धेत दुखापतीमुळे सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र भारतीय संघातील अन्य खेळाडूंसमवेत त्याला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सुशीलला खांद्याच्या दुखापतीने ग्रासले आहे. त्याच्यावर तो उपचार घेत आहे. प्रो-लीगपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. याबाबत सुशील म्हणाला की, ‘‘दुखापतीमुळे मी जागतिक स्पर्धेत सहभागी होणार नाही. मात्र आपल्या खेळाडूंसमवेत मी तेथे जाणार आहे. भारतीय कुस्ती महासंघानेच मला तेथे सरावासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.’’
प्रो लीगविषयी सुशील कुमार म्हणाला की, ‘‘आपल्याला लिलावाद्वारे संघात घेतले जाण्याची संकल्पनाच खूप वेगळी आहे, मात्र बदलत्या काळानुसार या गोष्टींचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. मी कोणत्या संघाकडून खेळणार आहे हे महत्त्वाचे नसून, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणे हे माझे मुख्य ध्येय असेल. या स्पर्धेद्वारे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना भावी कारकीर्दीसाठी अनुभवाची शिदोरी मिळणार आहे.’’

’लीगमध्ये सहा फ्रँचाईजींचा समावेश राहणार असून प्रत्येक फ्रँचाईजीकरिता तीन कोटी रुपये ही पायाभूत किंमत राहील. सात सप्टेंबरपूर्वी या फ्रँचाईजी निश्चित केल्या जाणार आहेत.
’प्रत्येक संघात सहा पुरुष व पाच महिला खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक संघात सहा भारतीय व पाच परदेशी खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. एका लढतीत जास्तीत जास्त चारच परदेशी खेळाडू भाग घेऊ शकतील.
’प्रत्येक कुस्ती तीन मिनिटांची राहील व त्यामध्ये एका मिनिटांनतर मध्यांतर राहील. अव्वल साखळीनंतर पहिले चार क्रमांकांचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

Story img Loader