ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कबड्डीला प्रो-कबड्डीमुळे वलय निर्माण झाले आहे. मात्र अजूनही राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कबड्डी खेळाचे सामने वेळेच्या बंधनात अडकलेले दिसत नाहीत. भविष्यात कबड्डीची लोकप्रियता टिकवायची असेल, तर आंतरराष्ट्रीय किंवा लीग पातळीवर दाखवली जाणारी व्यावयासिकता राखणे आवश्यक आहे. यासाठीच कबड्डीच्या सामन्यांना वेळेच्या बंधनात अडकविण्याची गरज होती आणि तो प्रयत्न राज्य अजिंक्यपद स्पर्धेत करण्यात आला, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते आणि राज्य संघटनेचे समन्वयक शांताराम जाधव यांनी व्यक्त केले.

कबड्डी स्पर्धाचे आयोजन आणि उशीर हे समीकरण मोडण्याचा एक प्रयत्न अलीकडेच अहमदनगरमध्ये पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आला. सामने वेळेवर सुरू करण्यासाठी राज्य संघटनेने या वेळी शांताराम जाधव आणि सचिन भोसले यांच्यावर समन्वयक म्हणून ही जबाबदारी सोपविली होती. यासाठी सर्व संघांना स्पर्धेपूर्वी त्यांचा सर्व कार्यक्रम वेळेनुसार आखून देण्यात आला होता.

‘‘पहिल्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो. कबड्डी सामने फक्त लीगमध्येच वेळेवर सुरू होतात असे नाही, तर थोडी शिस्त बाळगली तर स्थानिक पातळीवरील स्पर्धातही ते शक्य होते हे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने करून दाखवले,’’ असे जाधव म्हणाले.

‘‘सामने वेळेवर सुरू होण्यासाठी स्थानिक संयोजकांनी देखील उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळय़ात होणारी भाषणे, सत्कार सोहळे यांच्यावर मर्यादा घालून उचित साथ दिली. भविष्यात राज्य संघटना सर्व जिल्हा संघटनांना बरोबर घेऊन त्यांचे कार्यक्रमही असे वेळेत संपविण्याच्या सूचना करणार आहेत,’’ असेही जाधव यांनी सांगितले.

राज्य संघटनेने सामने वेळेवर सुरू करण्याचा पायंडा या स्पर्धेपासून घालून दिला हे चांगले झाले. यामध्ये सातत्य टिकून राहिल्यास निश्चितच राज्याच्या कबड्डीत सुधारणा होईल आणि संघांना वेळेवर येण्याची शिस्त लागेल. – राजू घुले, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू