अन्वय सावंत
मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई करणे, ही अभिमानास्पद बाब आहे. या यशामुळे भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित होते, असे मत ऑलिम्पियाडमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय महिला ‘अ’ संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले.
यंदा चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत महिला विभागातील भारतीय ‘अ’ संघाला अग्रमानांकन लाभले होते आणि त्यांनी पहिल्या १० फेऱ्यांमध्ये दमदार कामगिरी करताना गुणतालिकेत अग्रस्थान राखले होते. परंतु ११व्या आणि अखेरच्या फेरीत अमेरिकेकडून १-३ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या फेरीत आमच्या संघाला सर्वोत्तम खेळ न करता आल्याचे नक्कीच शल्य आहे. मात्र, या संघाची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद होती, असे प्रशिक्षक कुंटे म्हणाले.
‘‘भारताच्या महिला संघाला यंदा प्रथमच ऑलिम्पियाड स्पर्धेत पदकाची कमाई केली. महिला विभागातील आमच्या संघाला अग्रमानांकन मिळाले होते; पण आमचे अव्वल सातपैकी सहा संघांशी सामने झाले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या युक्रेनला आम्ही बरोबरीत रोखले, तर रौप्यपदक विजेत्या जॉर्जियावर आम्ही मात केली. आम्हाला १० फेऱ्यांपर्यंत कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले होते; परंतु अखेरच्या फेरीत अमेरिकेविरुद्ध आम्ही अपयशी ठरलो. मात्र, त्यानंतरही आम्ही कांस्यपदक जिंकणे हे खूप मोठे यश आहे,’’ असे कुंटे यांनी सांगितले.
‘‘भारतीय महिला संघाला यापूर्वी ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकता आले नव्हते. त्यातच यंदा यजमान असल्याने यशस्वी कामगिरीसाठी आमच्यावर दडपण होते. मात्र, आमच्या खेळाडूंनी हे दडपण योग्य रीतीने हाताळत ऐतिहासिक पदक मिळवले. गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतही भारतीय संघाने पहिल्यांदा पदककमाई केली होती. सलग दोन स्पर्धामधील या कामगिरीमुळे भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. कोणतीही स्पर्धा असली, तरी आपण पदकासाठी दावेदार आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे,’’ असेही कुंटे म्हणाले.
तानिया, वैशालीची उल्लेखनीय कामगिरी
महिला विभागातील कांस्यपदक विजेत्या भारतीय ‘अ’ संघात कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर. वैशाली, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांचा समावेश होता. या पाचही जणींनी महत्त्वाचे योगदान दिले असले, तरी तानिया आणि वैशालीची कामगिरी विशेष उल्लेखनीय होती, असे कुंटे यांना वाटते. ‘‘तानिया (८ गुण) आणि वैशाली (७.५ गुण) यांनी सर्व सामने खेळताना आमच्या संघाकडून सर्वाधिक गुण मिळवले. या दोघींनी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. वैशाली खूपच युवा (२१ वर्षे) असून तिचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे कुंटे यांनी नमूद केले.