भारताविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांनी शुक्रवारी सकाळी आश्वासक सुरुवात केली. मात्र, दुपारनंतर त्यांचे फलंदाज मैदानावर टिकून राहू शकले नाहीत. दुसऱया दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सात गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावा झाल्या होत्या.
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या कसोटीचा गुरुवारचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या भोजनापर्यंत सलामीच्या जोडीने १०९ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. याआधी २०१० मध्ये शेन वॅटसन आणि सिमॉन कॅटिच यांनी ८७ धावांची भागीदारी केली होती.
भोजनानंतर रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचे दोन मोहोरे टिपले. जडेजाच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ७१ धावांवर तर कर्णधार मायकल क्लार्क शून्यावर बाद झाला. त्यानंतर ओझाने फिलिप ह्युघेसला अवघ्या २ धावांवर बाद केले. कोवेन मैदानावर चांगली लढत देत असतानाच अश्विनने त्याला ८६ धावांवर बाद केले. ईशांत शर्माने ब्रॅड हॅडिन आणि मोझेस हेनरिक्स यांना त्रिफळाबाद केले. हेनरिक्स तर आपले खातेही उघडू शकला नाही. जडेजाने पीटर सिडलला टिपले. सिडलही भोपळा फोडू शकला नाही. दुसऱया दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी स्टिव्हन स्मिथ ५८ धावांवर आणि मिशेल स्टार्क २० धावांवर खेळत आहेत.

Story img Loader