भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आगामी निवडणुकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नियमावलींचा उपयोग केला जात नसल्यामुळे महासंघावर बंदीची कारवाई करण्याचा प्रस्ताव आयओसीच्या आगामी कार्यकारिणीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
आयओसीचे महासंचालक ख्रिस्तोफर डी कीपर यांनी आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांना याबाबत पत्र लिहिले आहे. केंद्रीय क्रीडामंत्रालय व आयओए यांच्यातील मतभेद सोडविण्यासाठी आयओसीने एक शिष्टमंडळ पाठवावे अशी विनंती मल्होत्रा यांनी आयओसीकडे केली होती मात्र ही विनंती आयओसीने फेटाळून लावली आहे. आयओएने स्थानिक स्तरावरच हा प्रश्न सोडवावा, असे आयओसीने कळविले होते.
आयओएची निवडणूक केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या तरतुदीनुसार होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या शिफारसींनुसार निवडणूक घेण्यास आयओएचा जरी विरोध असला तरी त्याच शिफारसींचा उपयोग आगामी निवडणुकीत केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या पद्धतीने निवडणूक घेणे हे आयओसीच्या नियमावलींचा भंग होईल व तसे झाल्यास आयओएला बंदीच्या नामुष्कीस तोंड द्यावे लागेल, अशा आशयाचे पत्र आयओसीचे अध्यक्ष जॅक्वीस रॉज व आशियाई ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांनी आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा व सरचिटणीस रणधीरसिंग यांना यापूर्वीच लिहिले होते.
आयओसीने आता पत्र लिहिल्यामुळे आगामी निवडणुकीत आयओसीच्या घटनेचा आदर करणे अनिवार्य असल्यामुळे आयओएचे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. आयओसीच्या नियमावलीनुसारच निवडणूक घेतली जाईल अशी हमी आयओएने आयओसीकडे पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जर ३० नोव्हेंबपर्यंत ही हमी मिळाली नाही तर ४ व ५ डिसेंबर रोजी आयओसीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आयओएवरील बंदीचा प्रस्ताव ठेवला जाईल. आयओसीच्या नियम २७.९ व ५९.१.४ नुसार ही कारवाई केली जाईल. असेही रॉज व शेख यांनी कळविले आहे.
आयओएच्या गोंधळाला
मल्होत्राच जबाबदार -रणधीर
आयओएबाबत जो काही गोंधळ सुरू आहे त्यास प्रभारी अध्यक्ष मल्होत्राच जबाबदार आहे असा आरोप आयओएचे सरचिटणीस रणधीरसिंग यांनी केला आहे. ते म्हणाले, मल्होत्रा व अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झालेले अभयसिंह चौताला यांच्यामुळेच भारतात ऑलिम्पिक चळवळ धोक्यात आली आहे. आयओएची मान्यता काढून घेतल्यास भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळणार आहे. दुर्दैवाने चौताला गटास त्याची फिकीर वाटत नसून केवळ संघटनेमधील खुर्ची महत्त्वाची वाटत आहे.    

Story img Loader