नवी दिल्ली : आंदोलक कुस्तीगीर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आता अधिक आक्रमक झाले असून, लढय़ाला अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी आज, रविवारी जंतरमंतरवरच महापंचायतीचे आयोजन केले आहे.
भारताच्या प्रमुख कुस्तीगिरांच्या आंदोलनाचा शनिवारी १४वा दिवस होता. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून, चौकशीलाही सुरुवात केली आहे. मात्र, कुस्तीगीर आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.
आजपर्यंत आम्हाला जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल आभार. भविष्यात असाच पाठिंबा राहू द्यात, असे विनेश फोगट म्हणाली.
राजकीय व्यक्तींकडून आंदोलनाला वेगळे वळण मिळाल्याचे कुस्तीगिरांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु आता त्यांनी खाप पंचायती, किसान, मजूर संघटना, विद्यार्थी संघटना यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याचा एक भाग म्हणून रविवारी थेट जंतरमंतरवर पंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘‘आम्ही सर्वजण शांततेत आंदोलन करत असल्यामुळे रविवारी आम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी येणाऱ्या कुणालाही अडवू नये,’’ असे आवाहन विनेशने पोलिसांना केले आहे. त्याचबरोबर बजरंगने पाठिंबा दर्शविण्यासाठी नागरिकांना रविवारी सायंकाळी ७ वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.
आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कुस्तीगिरांनी दोन समित्यांची स्थापना केली असून, तेच आता पुढील पाऊल ठरवतील असेही कुस्तीगिरांनी सांगितले.
क्रीडा मंत्रालयाकडून कुठल्याही प्रकारे आमच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यांना आमच्या मागण्या माहीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, त्यांना भेटायचे असेल, तर आम्ही तयार आहोत. – बजरंग पुनिया