नवी दिल्ली : आम्ही जिंकलेली सर्व पदके आणि पुरस्कार सरकारला परत देण्यास तयार आहोत. आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर या पदकांचा आणि पुरस्कारांचा काय उपयोग, असा सवाल आंदोलक कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे निदर्शने करणारे कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या झटापटीनंतर आता आंदोलक आक्रमक झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूसह एकूण सात महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत देशातील आघाडीचे कुस्तीगीर

२३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. दिल्ली येथे रात्रीच्या वेळी पाऊस होत असल्याने आंदोलक कुस्तीगिरांना अतिरिक्त गाद्या आणि लाकडी खाटा आंदोलनाच्या ठिकाणी आणण्याच्या होत्या. आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी ‘फोिल्डग’ खाटा तिथे आणल्या होत्या. सहायक पोलीस आयुक्तांनी त्यांना या खाटा आंदोलनाच्या ठिकाणी नेण्यास परवानगी दिली नाही. मात्र, कुस्तीगिरांनी लाकडी खाटा आत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि आंदोलक कुस्तीगिरांमध्ये झटापट झाली. यात बजरंग पुनियाच्या खांद्याला, तर विनेश फोगटच्या गुडघ्याला मार लागला. तसेच दुष्यंत फोगटच्या डोक्याला दुखापत झाली.

‘‘कुस्तीगिरांना अशी वागणूक मिळत असेल, तर त्या पदकांचा काय उपयोग? त्यापेक्षा आम्ही पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करून सामान्य जीवन जगतो. पद्मश्री पुरस्कारप्राप्त कुस्तीगिरांना पोलीस धक्का देत होते, शिवीगाळ करत होते. माझ्यासह साक्षीही (मलिक) तिथे होती. पोलीस आमच्याशी गैरवर्तन करत होते,’’ असे बजरंग म्हणाला.

विनेश, साक्षी आणि बजरंग हे तिघेही खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत. साक्षी (२०१७) आणि बजरंग (२०१९) यांना पद्मश्री, तसेच बजरंग (२०१५) आणि विनेश (२०१६) यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर; पण आंदोलन सुरू ठेवणार!

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तीन महिला कुस्तीगिरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात तक्रारदारांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आली आहे, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर असला, तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुस्तीगिरांनी स्पष्ट केली आहे. ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जे केले, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला नव्हता; परंतु सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि गुन्हा नोंदवला गेला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आमच्यासाठी धक्का नाही. आमच्याकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू,’’ असे विनेश फोगट म्हणाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesting wrestlers threaten to return medals awards after after delhi police action zws