Virat Kohli Gautam Gambhir Fight: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. आयपीएल २०२३मध्ये ते पुन्हा एकदा जगासमोर उघडपणे आले. मे महिन्याच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये भांडण झाले. विराट आणि गंभीर मैदानावर आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१३ च्या आयपीएलमध्येही दोघे मैदानावर भिडले होते. त्यांच्यातील वादावर पाकिस्तानचा खेळाडू अहमद शहजादने वादाला भडकवणारे विधान केले.
नादिर अली पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान अहमद शहजादने गौतम गंभीरवर निशाणा साधला. शहजाद म्हणाला की, “गौतम गंभीर जे काही करतो, त्यातून त्याला विराट कोहलीविषयी इर्षा वाटते. गौतम गंभीर लढण्यासाठी निमित्त शोधत राहतो. यामुळे तो लखनऊ सुपरजायंट्सच्या युवा खेळाडूंचे मन कलुषित करत आहे.” याबरोबरच त्याने आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणावर आणखी बरच काही बोलला आहे.
गंभीर विराट कोहलीवर जळतो- अहमद शहजाद
गौतम गंभीरने जे काही केले ते मत्सरामुळे केले असे अहमद शहजादने अकलेचे तारे तोडले. तो म्हणाला की, मी जे पाहिले ते खरोखरच दुःखदायक होते. अफगाणिस्तानचा तो खेळाडू (नवीन) आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर काय झाले ते मी समजू शकतो. या गोष्टी घडत राहतात, पण तुम्हाला जे समजत नाही ते म्हणजे गंभीर आपल्याच देशवासीयांना का टार्गेट करतो? जो सध्या जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने कोहलीविरुद्ध दाखवलेले हावभाव योग्य नव्हते. आयपीएलचा एक ब्रँड आहे आणि जर कोणी भारतीय सुपरस्टारला काही म्हणत असेल तर याचा अर्थ ड्रेसिंग रूममध्ये द्वेषाचे वातावरण आहे. गौतम गंभीर हा विराट कोहलीच्या यशावर जळतो.” असे म्हणत त्याने या वादाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न केला.
शहजाद आणखी काय म्हणाला?
पाकिस्तानसाठी १५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या शहजादने सांगितले की, “गंभीरला कोहलीसोबत समस्या असल्याचे आम्ही यापूर्वीही पाहिले आहे. त्याने एकदा आपला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार कोहलीसोबत शेअर केला होता. विराटने तुला त्यावेळी विचारलं का? की त्याला तुझा पुरस्कार देऊन आयुष्यभर शिव्या देण्याचा अधिकार तुला मिळेल?”
शहजाह म्हणतो की त्याने कधीही कोणत्याही सपोर्ट स्टाफला खेळाडूच्या लढ्यात उडी मारताना पाहिले नाही. तो म्हणाला, “मला वाटते की कोहलीला मिळालेला आदर आणि यश तो पचवू शकला नाही. एवढ्या लहान वयात त्याने जे मिळवले ते गंभीरला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळवता आले नाही. जर तुम्ही खरोखर मोठे खेळाडू असाल तर ते मनातून तुमच्या हावभावात दिसते. आपली चूक लक्षात घेऊन तिथे माफी मागितली पाहिजे होती.”
संजय बांगर यांनी शहजादला सुनावले
“पाकिस्तानी खेळाडू आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडण सर्वांनाच आठवत असेल. गौतम गंभीरशी अनेकदा मैदानावर पाकिस्तानी खेळाडू भांडताना दिसले. कदाचित त्यामुळेच जेव्हा जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळते तेव्हा ते गौतम गंभीरविरुद्ध गरळ ओकतात. पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादने गौतम गंभीरविरोधात केलेले विधान हे त्याचेच मोठे उदाहरण आहे. त्यामुळे याकडे फारसे लक्ष देऊ नये. ती घटना आता जुनी झाली आहे.” असे मत संजय बांगर यांनी व्यक्त केले.