पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) नवा वाद निर्माण झाला आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झल्मी यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर यांच्यात वाद निर्माण झाला आहे. चार वर्षांपूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) सोहेल तन्वीरने बेन कटिंगला बाद करून अश्लील हावभाव केले होते, ज्याचा बदला बेन कटिंगने कालच्या सामन्यात घेतला होता. एकाच षटकात ४ षटकार मारत बेन कटिंगने त्नवीरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
पेशावर झल्मीच्या फलंदाजीदरम्यान हा प्रकार घडला. सोहेल तन्वीरने १९व्या षटकात अष्टपैलू बेन कटिंगचा सामना केला. बेन कटिंगने तन्वीरला लागोपाठ तीन षटकार ठोकून चार वर्षांपूर्वीचा बदला घेतला. त्यानंतर तनवीरच्या चेंडूवर त्याने आणखी एक षटकार ठोकला आणि षटकात एकूण २७ धावा वसूल केल्या. षटकाच्या शेवटी दोन्ही खेळाडू एकमेकांशी भांडताना दिसले. अंपायर आणि इतर खेळाडूंनी हे प्रकरण शांत केले असले, तरी शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन कटिंगने त्याची विकेट गमावली आणि सोहेल तन्वीरने त्याचा झेल घेतला, त्यानंतर त्याने पुन्हा मधल्या बोटाने बेन कटिंगकडे इशारा केला.
हेही वाचा – IND vs WI 1st T20 : कधी, कुठे, कशी पाहता येणार मॅच? जाणून घ्या इथे!
सोशल मीडियावरही या दोन खेळाडूंमधील भांडणाच्या चर्चा रंगत आहेत. पाकिस्तान सुपर लीग किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप या वादावर आपला निर्णय दिलेला नाही, मात्र वृत्तानुसार या दोन्ही खेळाडूंना मोठी शिक्षा होऊ शकते. कारण ४ वर्षांपूर्वी सोहेल तन्वीरला सामन्याच्या फीमधून १५ टक्के दंड ठोठावण्यात आला होता.