अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिन गोलंदाज राशिद खान याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान संघाला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बांगलादेश (अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश) दौरा करावा लागणार आहे. राष्ट्रीय संघात आपली सेवा देण्यासाठी राशिदने हा निर्णय घेतला आहे.
राशिद पीएसएलच्या चालू हंगामात लाहोर कलंदर संघाकडून खेळत होता. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका २३ फेब्रुवारीपासून चितगाव येथे होणार आहे. राशिदने सत्रातील शेवटचा सामना शनिवारी इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध खेळला. या सामन्यात राशिदने ४ षटकात १९ धावा देत २ बळी घेतले.
हेही वाचा – VIDEO : यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह विश्वविजेत्या कॅप्टननं नोंदवला नवा विक्रम!
सामन्यानंतर लाहोर कलंदरच्या खेळाडूंनी राशिद खानला मैदानातून गार्ड ऑफ ऑनर देऊन निरोप दिला. राशिद मैदानातून बाहेर पडत होता, त्यावेळी कलंदर संघाच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंनी हात वर केले आणि आपल्या स्टार गोलंदाजाला गार्ड ऑफ ऑनर दिला. राशिदला टाळ्यांच्या कडकडाटात मैदानातून निरोप देण्यात आला. यावेळी राशिद भावूक झाला. या स्पर्धेत पुन्हा एकदा राशिदने आपल्या फिरकीची जादू दाखवली. पीएसएल २०२२च्या ९ सामन्यात त्याने एकूण १३ विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने राशिदला मिठी मारून निरोप दिला.