महत्त्वाच्या लढतींप्रसंगी येणारे दडपण प्रदर्शनावर विपरीत परिणाम करू शकते. म्हणूनच आधुनिक खेळांमध्ये मानसशास्त्राची भूमिका निर्णायक आहे. तणावावर मात करून सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी भाऊ श्री अडवाणीची भूमिका माझ्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया पंकज अडवाणीने व्यक्त केली. पंकजने लीड्स येथे झालेल्या वेळेआधारित जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पंकजचे या कारकिर्दीतील हे बारावे जेतेपद आहे. वेळ आणि गुण दोन्ही प्रकारातले जेतेपद पटकावण्याची पंकजने हॅट्ट्रिक साधली.
‘‘श्री हा देशातील नामवंत क्रीडा मानसशास्त्रज्ञ आहे. अंतिम लढतीतही तो ऑनलाइन माध्यमातून माझी लढत पाहत होता. त्याने दिलेल्या सूचना उपयुक्त ठरल्या. खेळताना भावभावना, दडपण हाताळणे खरेच कठीण असते. या मुद्दय़ांवर मी गेले काही दिवस मेहनत घेत होतो. त्यामुळे दोन्ही प्रकारांतील जेतेपद पटकावू शकलो,’’ असे पंकजने सांगितले. बिलियर्ड्समध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर पंकज जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी शेफील्ड येथे रवाना झाला.
तो पुढे म्हणाला, ‘‘क्रीडा मानसशास्त्र हा आधुनिक खेळांचा अविभाज्य घटक झाला आहे. क्रीडापटूच्या कौशल्याला आणि तंत्राला पदक किंवा यशापर्यंत नेण्यातही मानसोपचारतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. जेतेपदापर्यंतचा रस्ता खडतर असतो. मोक्याच्या क्षणी उंचावलेला खेळ किंवा छोटय़ा गोष्टी समीकरण पालटवू शकतात. दडपणाच्या क्षणी मानसिक कणखरता कामी येते. श्रीने मला या गोष्टीत खूप मदत केली आहे.’’
अद्भुत कामगिरीसह २९ वर्षीय पंकजने अनेक विक्रम रचले आहेत. त्याविषयी विचारले असता पंकज म्हणाला, ‘‘खूप सारे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. हा विजय, विजेतेपद संस्मरणीय असेच आहे. आकडे विस्मयचकित करणारे आहेत. आकडेपटू, खेळावर प्रेम करणारे चाहते यांच्यासाठी विक्रमांची आकडेवारी आपलीशी वाटणारी असेल. खेळाडू म्हणून मला आता समाधानी वाटते आहे. परंतु प्रत्येक स्पर्धेगणिक, विजयानिशी मी अधिक परिपक्व होत जातो.’’
आईच्या जन्मदिनीच विश्वविजेतेपद पटकावू शकल्याने प्रचंड आनंद झाल्याचे पंकजने सांगितले. ‘‘माझ्या कारकिर्दीत आईची भूमिका दीपस्तंभासारखी आहे. बहुतांशी तांत्रिक आणि प्रशासकीय गोष्टी ती हाताळते, त्यामुळे मी सर्वस्वी खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो. २००३मध्ये पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले होते. तो क्षण मला आजही आठवतो,’’ असे पंकज या वेळी म्हणाला.
‘‘खेळाडू म्हणून ही स्पर्धा खेळताना मला वेगळी भावना होती. खेळाडू म्हणून माझ्या खेळात सुधारणा झाली आहे. २००५ आणि २००८मध्येही मी दुहेरी जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर प्रशिक्षणासाठी मी इंग्लंडला आलो. खेळातले अनेक बारकावे मी शिकलो. मी अधिक व्यावसायिक खेळाडू झालो आहे. कधी बचावात्मक पवित्रा स्वीकारायचा कधी आक्रमण करायचे याविषयी मी सक्षम झालो आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.
‘‘भविष्याविषयी कोणालाच काही ठाऊक नाही. गीत सेठी यांच्यासारख्या महान खेळाडूने केलेले कौतुक हुरूप वाढवणारे आहे. या जेतेपदाचा मी तूर्तास आनंद घेतो आहे. मी किती काळ खेळणार आहे याची कल्पना नाही. जोपर्यंत खेळाचा आनंद घेत आहे तोपर्यंत खेळत राहीन. स्वत:ची शैली विकसित केल्यामुळेच हे यश मिळवू शकलो,’’ असे पंकजने सांगितले.
राष्ट्रपतींकडून अभिनंदन
जागतिक बिलिअर्ड्स अजिंक्यपदावर (वेळ प्रकारात) नाव कोरणाऱ्या पंकज अडवाणीचे कौतुक करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘‘पंकजने मिळविलेले यश देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावे असे आहे. त्याने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्याच्या या कामगिरीविषयी मला खूप आनंद झाला आहे. अशीच कामगिरी तो भविष्यात करीत राहील व देशाचा तिरंगा उंचावत ठेवेल, अशी खात्री आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा