भारतीय बॅडमिंटन असोसिएशन कडक धोरण अवलंबणार
सय्यद मोदी इंडियन ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतून आघाडीची खेळाडू सायना नेहवाल हिने वादग्रस्तपणे माघार घेतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन असोसिएशन (बीएआय) आता कारवाई करणार आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे असोसिएशनने ठरवले आहे.
पहिल्या फेरीत विजय आवाक्यात असतानाही सायनाने गुडघ्याच्या दुखापतीचे कारण पुढे करून सामन्यातून माघार घेतली. या प्रकारानंतर बीएआयने २३ डिसेंबर रोजी बैठक बोलावली असून याविषयी कडक कायदे बनवण्यात येतील, असे असोसिएशनच्या सूत्रांकडून समजते. ‘‘राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची यादी बनवण्याआधी त्यांची तंदुरुस्तीची चाचपणी करण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडूंनाही स्पर्धेआधी आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल,’’ असेही त्यांनी सांगितले.
सायनावर कारवाई केली जाईल का, असे विचारले असता बीएआयचे उपाध्यक्ष टी. पी. एस. पुरी म्हणाले, ‘‘दुखापतग्रस्त असतानाही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या नियमांमुळे सायनाला सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत खेळावे लागले. सायना ही प्रामाणिक असल्यामुळे तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.’’
सायना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी कायम
लखनौ : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. सायनाला आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीमधील सर्वोत्तम असे दुसरे स्थान गाठण्याची पुन्हा संधी होती. परंतु या वर्षीचे काही निकाल अनुकूल न लागल्यामुळे ही संधी हुकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा