विकास ठाकूर व पूनम यादव या भारतीय खेळाडूंनी पुणे महापौर चषक राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करीत भारताची प्रतिमा उंचावत ठेवली.  पूनमने ६३ किलो वजनी गटात कुमार मुली व वरिष्ठ महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. तिने स्नॅच (९० किलो), क्लीन व जर्क (११० किलो) असे एकूण २०० किलो वजन उचलले. गतवर्षी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. युवा मुलींच्या विभागात बांगलादेशच्या माबिया अख्तरने स्नॅच (७८ किलो), क्लीन व जर्क (९८ किलो) असे एकूण १७६ किलो वजन उचलून सोनेरी कामगिरी केली. भारताच्या जी. ललिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताच्या विकास ठाकूरने ८५ किलो वजनी गटातील वरिष्ठ पुरुष विभागात तीन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये १५२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १८३ किलो असे एकुणात ३३५ किलो वजन उचलले. भारताच्या राहुल रंगला वेंकटने रौप्यपदकाचा मान मिळवला. त्याने कुमार मुलांच्या विभागात स्नॅच (१४६ किलो) क्लीन व जर्क (१८१ किलो) असे एकूण ३२७ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. युवा मुलांच्या विभागात मात्र श्रीलंकेच्या एस. विष्णुकंठ याला सुवर्णपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये १०२ किलो, क्लीन व जर्कमध्ये १२५ किलो असे एकूण २२७ किलो वजन उचलले. भारताच्या एस. आर. राजमनाथीने स्नॅचमध्ये ७५ किलो, क्लीन व जर्कमध्ये ९० किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलत रौप्यपदक मिळवले.

विकासने गतवर्षी चीनमध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये ७७ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले होते. राहुल वेंकटने गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रुपेरी कामगिरी केली होती.

Story img Loader